सज्जनगडावर श्रीधर कुटीसमोर इतिहास संशोधक बाबासाहेब देशपांडे यांचं घर होते.
त्याच जागेवर आता एक देखणी एकमजली इमारत उभी राहिली आहे. या इमारतीच्या वरच्या भागात निवासी
खोल्या असून, खालच्या बाजूला रस्त्याला लागूनच 'समर्थ सेवा मंडळाचे' पुस्तक विक्री केंद्र आहे.
येथे समर्थांच्या साहित्यापासून, अनेक आध्यात्मिक पुस्तके भक्तांना विकत घेता येतात.
दुर्मिळ ग्रंथांचा खजिना
तळ्याच्या बाजूला असलेल्या एका प्रशस्त हॉलमध्ये २००७ साली या ग्रंथालयाची सुरुवात झाली. हे
केवळ ग्रंथालय नसून ज्ञानाचा ठेवा आहे. जुन्या काळच्या रामदासी मंडळींनी, विशेषतः स. भ.
अय्याबुवांनी, जीवापाड जपलेले दुर्मिळ ग्रंथ आज येथे वाचकांसाठी उपलब्ध आहेत.
वेळ - सकाळी ९:३० ते ११:३० आणि दुपारी ४:०० ते ५:३० (यात्रेकरूंसाठी खुले).
संग्रह - वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण-महाभारत, संत वाङ्मय आणि समर्थांचे संपूर्ण
साहित्य अशा जवळपास ८,००० पुस्तकांचा यात समावेश आहे.
अभ्यासकांसाठी पर्वणी - भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या ग्रंथालयाचा लाभ केवळ
जिज्ञासूच नव्हे, तर पी.एच.डी. करणारे अनेक संशोधकही घेत आहेत.
सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सोहळे
केवळ ग्रंथालयच नाही, तर सेवा मंडळाने गडावर अनेक अविस्मरणीय सोहळे आयोजित केले आहेत:
१. भव्य कीर्तन महोत्सव (२०१३) - करवीरपीठ शंकराचार्यांच्या अध्यक्षतेखाली, पाच दिवस चाललेल्या या
सोहळ्यात दिग्गज कीर्तनकारांनी ज्ञानाची गंगाच इथे आणली. जे लोक सोहोळ्यास उपस्थित राहू शकले
नाहीत, त्यांच्यासाठी या सोहळ्याची खास सीडी (CD) देखील तयार करण्यात आली.
२. चतुर्वेद स्वाहाकार (२०१८) - ऋग्वेद स्वाहाकार आणि वेद परिचय निरूपणाचा एक भव्य कार्यक्रम पार पडला.
यात देशभरातून आलेल्या ४० दिग्गज (घनपाठी) वैदिकांनी सहभाग घेतला होता.
काळाप्रमाणे बदल आणि आधुनिकीकरण
बदलत्या काळाची पाऊले ओळखून सेवा मंडळाने आपल्या कार्यालयाचा चेहरामोहरा बदलला आहे -
संपूर्ण कामकाजाचे संगणकीकरण झाले आहे.
भक्तांच्या सोयीसाठी स्वाईप मशिन आणि ऑनलाईन देणगीची सुविधा उपलब्ध आहे.
पर्यावरणाचा विचार करून गडावर सोलर वीज प्रकल्प राबवण्यात आला आहे.
एक अविरत सेवा
"आधी देवाचे वैभव वाढवावे, मग आपले पहावे" या समर्थांच्या उक्तीप्रमाणे १९५० पासून सेवा मंडळ गडाचा
कायापालट करण्यासाठी झटत आहे. या कार्याला श्रीधर स्वामींची प्रेरणा आणि असंख्य रामदासी कार्यकर्त्यांचे
कष्ट लाभले आहेत. या सेवेचा विस्तार इतका मोठा आहे की, तो शब्दांत मांडणे कठीणच! या पवित्र कार्याला
मनापासून वंदन करून येथेच विराम घेतो.
आगामी कार्यक्रम
श्रीसमर्थ पादुका प्रचार दौरा
लोकांना समर्थांची आणि त्यांच्या तत्वज्ञानाची ओळख व्हावी, समर्थभक्तीने लोककल्याण व्हावे, सर्वत्र ‘जय
जय रघुवीर समर्थ’ घोष गर्जावा अशा उद्देशाने, पहिला पादुका प्रचार दौरा आयोजित केला.