नांदेड जिल्ह्यात देगलूर या नांवाचे गांव आहे. त्या ठिकाणी स्वामीजींचे वाडवडिल रहात होते. त्यांचे नांव पतकी व ते देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. स्वामीजींचे वडिल नारायणराव व त्यांचे वडिल बंधू गोविंदराव हे आपल्या चुलत्याकडेच लहानाचे मोठे झाले. त्यांना घरची सर्व कामे करावी लागत. तेथे अनेक प्रकारचे त्रास व अपमान सहन करावे लागत होते. त्यांनी कंटाळून ते घर सोडले व नशिबाची परिक्षा पहाण्यासाठी हैद्राबादला रवाना झाले. कालांतराने त्यांची व एका श्रीमंत गृहस्थाची गाठ पडली आणि लोभही जडत गेला. पुढे त्यांनी या दोघांचे विवाहही करुन दिले. गोविंदरावांना मूलबाळ झाले नाही, नारायणराव यांना रेणुका नांवाची कन्या झाली. त्यानंतर त्यांची पत्नी कालवश झाली. नारायणरावांनी पुन्हा दुसरा विवाह केला.
या विवाहाने त्यांच्या जीवनात आमूलाग्र असे परिवर्तन घडून आले. दुसरी पत्नी कमलाबाई ह्या फारच देखण्या, प्रेमळ, सुदृढ, सुशील व कर्तव्यदक्ष होत्या. याच श्रीधरस्वामीजींच्या माता होत. सहज बोलताना स्वामीजींनी त्यांची तुलना राजा हरिश्चंद्राच्या तारामतीशी केली होती ! या एकाच दृष्टांतावरुन माताजी काय होत्या हे कळून येईल. त्रिंबक, गोविंद व गोदावरी ही श्रीधरस्वामीजींची वडिल भावंडे. गोविंद हे तिस-या वर्षी वारले.
त्रिंबकची मुंज झाली व आठव्या वर्षी गोदावरीचे लग्न झाले. परंतु दुस-या पुत्राचे अकाली निधन झाले. मातापित्यास अतिशय दु:ख झाले. याचवेळी नारायणरावांना एक पुरोहित भेटले. त्यांनी कुटुंबाला असलेल्या सर्पशापाची हकिगत सांगितली. तसेच पहिले दोन्ही मुलगे अल्पायुषी असल्याबद्दलचे सांगितले. पुरोहिताच्या सांगण्याप्रमाणे आई-वडिलांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे लोककल्याणकारी सत्पुत्रप्राप्तीसाठी तपस्या केली. दत्तमहाराज प्रसन्न होऊन त्यांनी अंशरूपाने पोटी जन्म घेण्याचे अभिवचन दिले. माताजींना डोहाळे लागले तेही वैराग्यवृत्तीचे व त्यात त्या धर्मग्लानी, पुनरुद्धार याबद्दल बोलू लागल्या. दिनांक 7 डिसेंबर 1908 रोजी श्रीदत्तजयंतीच्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजता लाड-चिंचोळी येथे स्वामीजींचा जन्म झाला. हे गांव गाणगापूरपासून नऊ मैलावर आहे. मुलाचे नांव श्रीधर असे ठेवण्यात आले. वयाच्या तिस-या वर्षी वडिल व बाराव्या वर्षी आई वारली. मातोश्रींच्या वियोगापूर्वीच बंधू-भगिनी आदि सर्व नातेवाईक निवर्तले होते. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी ते मावशीकडे गेले. मावशीच्या परवानगीने ते 1923 मध्ये पुण्यास इंग्रजी चौथ्या इयत्तेत अ. वि. गृहात दाखल झाले. 1927 च्या विजयादशमीपर्यंत त्यांचे वास्तव्य पुण्यातच होते. माधुकरी मागून ते शिक्षण घेत. स्वामी लहानपणापासूनच एकांतप्रिय, वैराग्यप्रिय असे रामभक्त होते. पुण्यात शिक्षण चालू असताना त्यांनी पाठांतर व तत्वचिंतन फार केले. वयाच्या अठराव्या वर्षी विजयादशमीच्या दिवशी सज्जनगडावर तपश्चर्येसाठी ते निघाले. पुणे शहर सोडताना त्यांनी या प्रतिज्ञा केल्या-
आमरण अस्खलित ब्रह्मचर्य पाळीन.
द्रव्याला स्पर्श करणार नाही, कोणी दिल्यास त्याचा विनियोग परोपकारार्थ करीन.
कुठेच मठपती होऊन रहाणार नाही.
कमीत कमी गरजा ठेवीन.
स्त्री-पुरूषांना समदृष्टीने बोध करीन.
अखिल स्त्री-समाज मातेप्रमाणे मानीन.
धर्माला आलेली ग्लानी घालवून जग सुखी करीन.
देह लोककल्याणार्थ झिजवीन.
हे सर्व करण्यासाठी मी हा देह भगवंताला अर्पण केला आहे.
सज्जनगडावर त्यांच्या पारमार्थिक जीवनाला खरा प्रारंभ झाला. सेवा व ज्ञानसाधना याची साक्षात मूर्तीच बनून त्यांनी कठोर तपस्या केली. इतकेच काय, अल्पावधितच श्रीसमर्थकृपा संपादून ते प्राप्त पदाला पोहोचले. 1930 च्या दासनवमी दिवशी श्रीसमर्थ आज्ञेने ते सज्जनगडावरुन पायी निघाले व थेट दक्षिणेस संचार करावा या आज्ञेचे तंतोतंत पालन करुन गोकर्णास आले. तेथील अष्टबंध कार्यक्रम पूर्ण करुन शिगेहळी, वनवासी, कोडसाद्री, श्रृंगेरी भागांत संचार करुन धर्मप्रसार, प्रवचने वगैरे करीत होते. 1935 मध्ये पुन्हा ते सज्जनगडी आले. नंतर 1943 पर्यंत त्यांनी विपुल ग्रंथरचना केली. त्यांनी संस्कृत, मराठी, कानडी, हिंदी व इंग्रजी अशा पाच भाषेतून काव्यरचना व लिखाण केले. स्वामीजींनी लहानमोठे अनेक ग्रंथ लिहिले त्यात आर्यसंस्कृती हा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे. कर्नाटकातील काही सद्भक्तांच्या आग्रहामुळे त्यांना शिगेहळीला जाणे भाग झाले. श्रीसमर्थांच्या आज्ञेवरुन 1942 च्या विजयादशमीच्या दिवशी शिगेहळी आश्रमात स्वामींनी संन्यास धारण केला. स्वामींनी ब्रह्मचर्य आश्रमातून एकदम चतुर्थाश्रम स्वीकारला.
स्वामीजींनी संन्यास धारण केल्यानंतर एकंदर 32 वर्षे सतत धर्मप्रचाराचे कार्य केले. या कार्याचाच एक
भाग म्हणून श्रीसमर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या स्थानांचा जीर्णोद्धार करण्यासाठी स्वामीजींच्या
प्रेरणेनेच अनेक रामदासी एकत्र येऊन श्री समर्थ सेवा मंडळ ही संस्था 1950 साली स्थापन झाली. ह्या श्री समर्थ
सेवामंडळाच्या प्रत्येक कार्याला स्वामींचा सदैव आशीर्वाद असे. स्वामीजींनी प्रत्येक चातुर्मास एकांतपूर्ण
अनुष्ठान करुन गुरूकृपेचा स्वानंद अनुभवला व जीवनातील अखेरची दहा वर्षे वरदपूर आश्रमातच एकांतातच व्यतीत केली.
त्याच ठिकाणी स्वामीजीनी 1973 मध्ये चैत्र वद्य द्वितीया या दिवशी महासमाधी घेतली.
जय जय रघुवीर समर्थ
- मारुतीबुवा रामदासी
श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड