‘शिवथरघळ’ म्हणजे श्रीसमर्थ रामदासस्वामींच्या वास्तव्याने पावन झालेली ‘श्रीमत् ग्रंथराज दासबोधाची’ जन्मभूमी. या घळीत शके १५७६ ते १५९८ (इ.स. १६५४ ते १६७६) या कालावधीत श्री समर्थांनी बरेच वेळा वास्तव्य केले. इ.स. १६५४ ते इ.स. २०१५ पर्यंतच्या शिवथरघळीच्या इतिहासाचे चार टप्पे आहेत.
इ. स. १६०८ साली, रामनवमीच्या दिवशी औरंगाबादजवळील ‘जांब’ येथे श्रीसमर्थ रामदासस्वामींचा जन्म झाला. इ.स. १६२० ते १६३२ नाशिकजवळील ‘टाकळी’ येथे, श्री समर्थांनी खडतर तपःश्चर्या व शास्त्राभ्यास केला. तेथेच मारुतीची स्थापना करुन उद्धवस्वामींची पहिले ‘मठपती’ म्हणून नेमणूक केली. इ.स. १६३२ ते १६४४ तीर्थयात्रेच्या निमित्ताने भारतभ्रमण केले. या कालावधीत, परकीय सत्ताधाऱ्यांच्या पाशवी अत्याचाराला बळी पडून हिंदू समाजाची आणि हिंदू धर्माची झालेली दयनीय अवस्था पाहिली. देशस्थितीचे सूक्ष्म निरिक्षण केले. काय केले म्हणजे लोक सुखी होतील याचा विचार करुन इ.स. १६४४ साली श्रीसमर्थ कृष्णाकाठी आले; व लोकोद्धाराचे व धर्मोद्धाराचे कार्य सुरु केले; कारण येथे यवनांचे प्राबल्य कमी होते.
इ.स. १६४४ ते १६५४ पर्यंत सातारा ते कोल्हापूर परिसरांत मारुती मंदिरांची स्थापना केली. दिवाकर गोसावी, अनंत गोसावी, कल्याणस्वामी, वेणास्वामी, आक्कास्वामी असे अनेक सत्शिष्य ह्या महान कार्याच्या प्रवासात समर्थांना लाभले. मसूरला पहिला ‘रामनवमी’ उत्सव झाल्यानंतर, चाफळ येथे इ.स. १६४८ साली श्रीराम मंदिराची उभारणी केली. ‘श्रीरामनवमी’ व ‘हनुमान जयंती’ हे उत्सव सुरु केले. आपल्या अमोघ वाणीने लोकसंग्रह करुन लोकांमध्ये स्वाभिमान, धर्माभिमान व देशाभिमान जागृत केला. इ.स. १६५४ पर्यंत मंदिर-मठ-महंतांचे जाळे तयार झाले. धर्मस्थापनेच्या कार्याची सुरुवात झाली, पण स्वराज्याशिवाय लोक खऱ्या अर्थाने सुखी होणार नाहीत; हे जाणून श्री समर्थांनी आपल्या कार्यपद्धतीत हरिकथा निरूपणाबरोबर राजकारणाला महत्व दिले.
याच सुमारास, महाराष्ट्राच्या भाग्याने इ.स. १६४४ साली “यवनांनी आम्हा हिंदूंच्या स्वातंत्र्याचा अपहार करुन गोब्राह्मणांस व क्षेत्रादिकांस अनेक प्रकारे त्रास दिला आहे; व हिंदू धर्माला चहूकडे ग्लानी येत चालली आहे. हा अनिष्ट प्रकार बंद करुन स्वातंत्र्याची पुनःस्थापना करण्याविषयी तनमनेधनेकरुन उद्योग आरंभिण्याचा निश्चय मी केला आहे" हा संकल्प शिवाजी महाराजांनी दादोजी कोंडदेवांस बोलून दाखविला; आणि पुणे परिसरांत स्वराज्य स्थापनेच्या उद्योगास आरंभ केला. लोकांना आपलेसे करून देशस्थितीचे अवलोकन केले व सह्याद्रीचा हा मुलूख यवनांस दुर्घट आहे; हे जाणले आणि किल्ले हस्तगत करण्यास सुरुवात केली. इ.स. १६४६ मध्ये तोरणा किल्ला ताब्यात घेऊन स्वराज्य स्थापनेची महूर्तमेढ रोवली. याप्रमाणे महाराष्ट्रात एकाच वेळी धर्मस्थापना व स्वराज्यस्थापना यांची चळवळ सुरु झाली. शिवाजी महाराजांनी राजगड वगैरे इतर अनेक किल्ले हस्तगत केले. श्री समर्थांची धर्मोद्धाराची चळवळ शहाजीराजांच्या जहागिरीतच चालली होती. याची कल्पना शिवाजी महाराजांना असणे स्वाभाविक होते. श्री समर्थांनाही शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेच्या हालचाली कळत होत्या. 'निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसि आधारु ।' या पत्रांत श्री समर्थांनी शिवरायांची स्तुती केली आहे. या दोन्ही महापुरुषांची भेट कधी व कोठे झाली याबद्दल मतभेद आहेत. पण ज्या प्रांतात शिवरायांनी विजयश्री मिळवली, त्या प्रांतात अगोदरपासूनच समर्थांचे वास्तव्य होते व तेथे मठस्थापना झालेली होती. उदा. - शहाजीराजांची विजापूरहून सुटका झाल्यावर इ.स. १६५४ साली, शिवाजी महाराजांनी घाटमाथा व कोकणपट्टी ताब्यात घेण्याचा बेत केला. त्यासाठी ‘जावळी खोरे’ ताब्यात घेणे आवश्यक होते; ह्या प्रांतावर चंद्रराव मोरेंची सत्ता होती. हा महाराजांना सामोपचाराने वश होण्यासारखा नव्हता. त्याला एकतर अंकित तरी करुन घ्यावयास पाहिजे होते; किंवा तो काटा उपटून तरी टाकावयास पाहिजे होता. त्या खटपटीत महाराज अनेक वर्षे होते आणि याच चंद्रराव मोरेंच्या मुलखातील शिवथरघळीत श्रीसमर्थ शके १५७६ (इ.स. १६५४) च्या मार्गशीर्षापासून ग्रंथलेखनाच्या निमित्ताने रहावयास गेले होते. या घळीपासून एका हाकेच्या अंतरावर चंद्रराव मोरे यांचा वाडा होता, तेथे तो पुष्कळदा असे. चाफळ सोडून जेथे घोर अरण्य आहे तेथील एका गुंफेत श्रीसमर्थ रहावयास गेले. समर्थ म्हणतात, 'बहु झाडखंडे उदंडे अचाटे । गिरीसारिखी थोरथोरे कपाटे । बहु सावजे व्याघ्र सिंहे कलाली । तेथे रामदासे असे गुंफ केली ॥' याबाबत समर्थशिष्य दिवाकर गोसावींनी बहिरंभटास शके १५७६ (इ.स. १६५४) मध्ये पाठविलेले पत्र आहे, त्यात 'कल्याण गोसावी, चिमणाबाई, आका व अनंतकवी यांस घेऊन ग्रंथलेखनाकरीता शिवथरचे घळीत दहा संवत्सर रहाण्याचा संकल्प करुन श्रीसमर्थ गेले.' असे म्हटले आहे.
समर्थे चाफळ अधिष्ठानी श्रीराम संस्थापिले । मग सुंदरमठी समर्थांचे रहवे जाले ।
नाना गिरिकंधरी दास विहरे निर्मिले । नाना मठ करविले लोकोद्धारा ॥ (स.प्र. ७/२).
समर्थे सुंदरमठी गणपती केला । दोनी पुरुष सिंधुरवर्ण अर्चिला ।
सकळ प्रांतासी मोहोछह दाविला । भाद्रपद माघपर्यंत ॥ (स.प्र. ८/२).
याप्रमाणे इ.स. १६५४ मध्ये श्री समर्थांनी शिवथरघळीत राहून तेथे उत्सवादी खटाटोप केला. व दासबोध ग्रंथलेखनास आरंभ केला. दासबोधाच्या सहाव्या दशकाच्या चौथ्या समासात पुढील ओवी आहे. ‘चारि सहस्र सातसें साठीं । इतुकी कलयुगाची राहाटी | उरल्या कलयुगाची गोष्टी | ऐसी असे ॥ ७ ॥ यावरुन हा समास इ.स. १६५९ साली श्रीसमर्थ शिवथरघळीत लिहित होते. समर्थ शिवथरघळीत असतानाच शके १५७७ (इ.स. १६५५) च्या पौष महिन्यात शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरेंचा पाडाव करुन जावळी ताब्यात घेतली आणि शके १५७८ (इ.स. १६५६) च्या वैशाखात रायरी उर्फ रायगड किल्ला घेतला. या उभय प्रसंगी महाराजांच्या मदतीला कान्होजी जेधे, बांदल, सिलीमकर हे सरदार होते. कारी अंबवडे येथील जेधे देशमुखांचा वृत्तांत (रामदास रामदासी भाग ३०) सांगतो - मसूर, चाफळ सोडून चंद्रराव मोरे यांच्या मुलखांत शिवतर खोऱ्यासारख्या अवघड स्थळी श्रीसमर्थ का जाऊन राहिले असले पाहिजेत? हे ज्याला कल्पकता आहे, त्याच्या लक्षात आल्यावाचून रहाणार नाही.
लोककल्याणाची इतकी चिंता श्री समर्थांना लागली होती की, स्वराज्य हवे म्हणून काही गुप्त राजकारणासाठी अवघड शिवथरघळीत वास्तव्य केले आणि त्या एकांतात एकही क्षण फुकट न घालविता अरण्य श्वापदांच्या सान्निध्यांत अतिकष्ट सहन करुन मिळेल ते अन्न व मिळेल ती शय्या स्वीकारुन कोणत्याही विपरीत परिस्थितीत लोकांना आपले समाधान राखता यावे, यासाठी सर्वकाळी मार्गदर्शक होईल असा ‘दासबोध’ ग्रंथ निर्मिला व कल्याणस्वामींनी तो लिहून घेतला. (स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहीतसे - अनंतकवि). समर्थ स्वतः दासबोधांत म्हणतात - खनाळामधे जाऊन राहे । तेथे कोणीच न पाहे । सर्वत्रांची चिंता वाहे । सर्वकाळ ॥ (दास. १५/२/२३).
इ.स. १६५९ साली, शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. हा स्वराज्य स्थापनेच्या महान कार्यातील एक अतिशय महत्वाचा विजय समजला जातो. “ शिवाजीला जिवंत पकडून तरी आणीन किंवा त्याला यमसदनास पाठवीन असा विडा उचलणारा सरदार विजापुराहून निघाल्याची बातमी समजताच समर्थांनी जे धोरण सांगितले, जे आश्वासन दिले, ते सर्व ग्रंथराज दासबोधातील अठराव्या दशकाच्या सहाव्या समासात नमूद आहे. (समर्थावतार - नानासाहेब देव).
बरें ईश्वर आहे साभिमानी । विशेष तुळजाभोवानी । परंतु विचार पाहोनी । कार्य करण ॥ ९ ॥
म्लेंच दुर्जन उदंड । बहुता दिसांचे माजले बंड । याकारणे अखंड । सावधान असाव ॥ ९२ ॥
महायेत्न सावधपण । समईं धारिष्ट धरण । अद्भुतचि कार्य करण । देणे ईश्वराचे ॥ ९५ ॥
येश कीर्ति प्रताप महिमा । उत्तम गुणासी नाही सीमा । नाही दुसरी उपमा देणेईश्वराचे ॥ ९६ ॥
इतर सर्व घळींपेक्षा, या शिवथरच्या घळीत समर्थांचे रहाणे फार झाले, त्यामुळे ही घळ चाफळच्या मठाखालोखाल महत्व असलेला श्रीसमर्थांचा मठच बनली होती. तिला ‘सुंदरमठ’ असे नामाभिधान प्राप्त झाले इतके ते स्थान सुंदर आहे. तत्कालीन राजकारणात शिवथरचे महत्व फार होते. गिरीधरस्वामींच्या समर्थ प्रतापानुसार, व रा. रा. भाग ९ संप्रदायाची कागदपत्रे लेखांक १३ ते १६ व २६ नुसार शिवथरघळीत अनेकदा शिवसमर्थांच्या भेटी होत असत. इ.स. १६७४ जेष्ठ शुद्ध १३ ला रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हाही समर्थ शिवथरघळीतच होते. नंतरही शके १५९८ (इ.स. १६७६) पर्यंत समर्थ तेथे जाऊन येऊन असत. शके १५९९ (इ.स. १६७७) मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वाकनिस दत्ताजी त्रिमल यांचे दिवाकर गोसावींना पत्र (लेखांक २६, रामदास रामदासी भाग ९) नुसार “ पूर्वी एकदा श्री शिवछत्रपती बिरवाडीस असता श्रीसमर्थ शिवथर प्रांती होते, मध्ये महानदी असून तिला महापूर आला होता, तेव्हा अकस्मात रात्री पलंगापाशी येऊन श्रीसमर्थांनी छत्रपतींना चमत्काररूपें दर्शन दिले (स.प्र. ३/६५). दुसरे दिवशी शिवथरप्रांती, सुंदरमठी भेटीसमयी श्री (समर्थ) भवतव्यार्थ बोलिले. तदनुसार चंदी प्राप्त झाली.” कृष्णाकाठी आल्यापासूनच्या ३२ वर्षाच्या काळात श्रीसमर्थांना भरपूर कष्ट झाले हे जाणून त्यांना विश्रांती मिळावी व एकाच ठिकाणी वास्तव्य असावे म्हणून आपल्या अखत्यारीतील समर्थांना आवडणाऱ्या सज्जनगडावर रहाण्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी विनंती केली व त्यानुसार श्रावण शुद्ध दशमी शके १५९८ (इ.स. १६७६) च्या उपलब्ध झालेल्या अस्सल पत्रानुसार (रा.रा. भाग ९) शिवाजी महाराजांनी जिजोजी काटकर, हवालदार व कारकून - किले सज्जनगड यांस लिहिले “ श्री रामदास गोसावी सिवतरी रहातात, सांप्रत काही दिवस गडावरी रहावया किलेयास येतील त्यांस तुम्ही गडावर घेणे, घर जागा बरा करुन देणे. हरयेकविसी खबर घेत जाणे. उतरो म्हणतील तेव्हा उतरो देणे.” शिवाजी महाराजांच्या विनंतीनुसार श्रीसमर्थांनी ‘शिवथरघळ’ सोडून सज्जनगडावर अखेरपर्यंत (शके १६०३, माघ वद्य ९ - जानेवारी १६८२) वास्तव्य केले. समर्थांच्या पश्चात लगेचच फाल्गुन महिन्यात दिवाकर गोसावी शिवथरघळीत होते. त्यांनी तेथे लिहिलेली अनुभवामृताची पोथी मिळाली आहे, त्यांत 'फाल्गुन वद्य दशमीस शिवथरचे घळयेस संपूर्ण केली’ असा निर्देश केला आहे. पण श्रीसमर्थांनी कोठे, कधी, कोणते कार्य/रचना केली याचा उल्लेख केला नाही, कारण 'न कळता करी कार्य जें तें । तें काम तत्काळचि होते । गचगचेत पडता तें । चमत्कारे नव्हे ॥ (दा. १९/९/१३)' हे समर्थांचे सूत्र होते व तत्कालीन परिस्थतीला आवश्यक अशी गुप्तता श्रीसमर्थांनी ठेवली होती. याप्रमाणे, इ.स. १६५४ ते १६८२ पर्यंत समर्थ व समर्थशिष्यांचे शिवथरघळीत वास्तव्य होते, तेथे दासबोधादी कित्येक ग्रंथ लिहिले गेले, तेथे शिवछत्रपती व श्रीसमर्थांच्या वारंवार भेटी झाल्या. शिवसमर्थांच्या पदस्पर्शाने ‘शिवथरघळ’ पावन झाली.
अशी ही पावन ‘शिवथरघळ’ १६८२ नंतर बराच काळ दुर्लक्षित राहिली, कारण राजकीय स्थित्यंतरे झाली. छत्रपती शिवरायांनी १६८० मध्ये देह ठेवला, त्यानंतर १७०७ साली, छत्रपती संभाजी महाराजांचेही निर्वाण झाले. छत्रपती शाहू महाराजांनी आपली राजधानी साताऱ्यात आणली. त्यामुळे रायगड, ‘शिवथरघळ’ यांचे महत्व संपले. सज्जनगड, चाफळ, टाकळी, डोमगांव येथे संप्रदाय टिकून होता; पण अधिकारी शिष्यांच्या पश्चात तेथेही अवकळा आली, त्यामुळे पुढे २०० वर्षे ह्या घळीचा संपर्क तुटला.
समर्थ संप्रदायाचा अभिमान मारुतीरायांना असल्यामुळे न्यायमूर्ती रानडे, संशोधक वि. का. राजवाडे अशा अभ्यासकांनी समर्थांच्या वाङ्मयाची महती स्वातंत्र्यप्राप्तीसाठी किती आवश्यक आहे याचा प्रसार एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस केला. लोकमान्य टिळकांनी रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानाचा जीर्णोद्धार करून ‘शिवजयंती उत्सव' सुरु केला.
त्यातून, धुळे येथील स.भ. नानासाहेब देव यांना प्रेरणा मिळाली; आणि श्रीसमर्थांच्या अनन्य भक्तीपोटी त्यांनी शारिरीक, आर्थिक व मानसिक झीज सोसून समर्थ संप्रदायाच्या मठांचा शोध इ.स. १९०३ च्या मार्गशीर्ष वद्य द्वादशीपासून सुरु केला. जुनी इतिहासकालीन कागदपत्रे गोळा केली. १९०५ पासून, ‘रामदास रामदासी’ या मालेतून त्यांच्या प्रकाशनास सुरुवात केली. या संशोधनासाठी पायी किंवा बैलगाडीने प्रवास करुन, श्रीसमर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या स्थळांचा शोध घेतला. त्याकाळी विजेची सोय नव्हती, प्रातर्विधीची सोय नव्हती, धड अन्न मिळण्याची सोय नव्हती, अशा परिस्थितीची खरी कल्पना या काळात कशी येणार?
जमा केलेल्या जुन्या कागदपत्रांचा स.भ. नानासाहेब देवांनी सखोल अभ्यास केला, त्यावेळी त्यांना श्रीसमर्थ शिवथरघळीत होते. तेथे दासबोधाचे लेखन झाले. तेथे शिवसमर्थांच्या भेटी होत होत्या हे कळले. अशा या पावन घळीचे आपणांस दर्शन घडावे. तेथे जाऊन आपले शरीर निचेष्टीत पडावे, तिच्यातील माती, धोंडे यांना पुन्हापुन्हा वंदन करावे अशी तीव्र इच्छा त्यांना झाली. म्हणून इ.स. १९०६ साली स.भ. नानासाहेब देवांनी सातारा परिसरात शिवथरघळीचा शोध केला. पण कागदपत्रांतील वर्णनानुसार बिरवाडी, पारमाची यांची जवळीक असलेली घळ त्यांना सापडली नाही. श्रीसमर्थांचा ‘सुंदरमठ’ म्हणजे चाफळचाच मठ असे त्यांना वाटत होते. पण इ.स. १९०७ साली समर्थ प्रताप ग्रंथ हाती पडला आणि लेखांक २६, रा. रा. भाग ९ या संदर्भानुसार ‘शिवथरघळ’ म्हणजेच श्रीसमर्थांचा ‘सुंदरमठ’ हे निश्चित झाले. इ.स. १९१५ पर्यंत, ‘शिवथरघळ’ शोधण्याचे त्यांनी खूप प्रयत्न केले. शेवटी १८ मे १९१५ रोजी ‘भोर’ – ‘हिरडोशी’ – ‘माझिरी’ या मार्गाने संशोधनास गेले. १९ मे १९१५ रोजी, माझिरीहून पारमाचीच्या बाजूने शिवथरला जाण्यासाठी एका वाटाड्याला बरोबर घेऊन, पहाटेस डोंगराच्या काठाकाठाने जात सज्जनगडाएवढा डोंगर उतरुन अनेक वर्षे निदीध्यास घेतलेल्या, त्या पवित्र शिवथर खोऱ्यात उतरले आणि त्यांना श्री समर्थांच्या चरणधुलीने पुनीत झालेल्या घळीचे दर्शन झाले; आणि अपार आनंद झाला. ही घळ इतरांस ज्ञात व्हावी म्हणून, त्याचे वर्णन त्यांनी 'पृथ्वीवरील स्वर्ग - शिवथरची घळ' या लेखांत केले आहे. (रा. रा. भाग १५).
“चौफेर डोंगराचा घेर असून मध्ये लहान लहान तीन गांवे आहेत. प्रथम गांव लागते ते कुंभे- शिवथर, समोरचे आंबे शिवथर व उजव्या बाजूचे काळनदीच्या पलिकडच्या तीरावरील कसबे शिवथर होय. या कसबे शिवथरच्या पाठीमागील डोंगराचे रांगेतच श्री समर्थांची ती घळ आहे. परंतु तेव्हापासून आतापर्यंत महाराष्ट्राने उपेक्षा केल्यामुळे घळीत पुष्कळच पडझड झालेली आहे. घळ सरासरी सव्वाशे फूट लांब व पाऊणशे फूट रुंद आहे. भिंतींच्या अवशिष्ट भागांवरुन असे दिसते की त्यावेळी घळीत दहा-बारा दालने असावीत. बाहेर डाव्या बाजूस वरुन पाणी पडत असते. घळीपासून सुमारे फर्लांगावर डोंगरातच वरच्या बाजूस चंद्रराव मोऱ्यांचा वाडा होता. वाडा आता अर्थात नाही, पण त्याच्या पायाच्या खुणा मात्र आहेत. तेथून तोरणा, राजगड, रायगड वगैरे ठिकाणी पायी दोन तासांत जाता येते.”
हे स्थान दुर्लक्षित होऊ नये, म्हणून त्यांनी प्रयत्न केले; पण त्या दुर्गम स्थानाचा जीर्णोद्धार करण्याचे धाडस कोणी केले नाही. त्यानंतर, संशोधनाच्या निमित्ताने महाड, बिरवाडी, वरंधा मार्गे दिनांक १६/०४/१९२७ रोजी पुन्हा त्यांनी शिवथरघळीचे दर्शन घेतले, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना ही घळ ज्ञात झाली.
सांप्रदायिक वृत्तचर्चा जीर्णोद्धार - खंड ६, पान २७४ मध्ये उल्लेख केल्यानुसार, एप्रिल १९३६ साली स.भ. नानासाहेब देव पुन्हा त्या पृथ्वीवरील स्वर्गात म्हणजेच शिवथरघळीत जाऊन आले. त्यावेळी त्यांना असे कळले की मागील तीन-चार वर्षात स.भ. महादेव नारायण नरे यांनी स्थानिक मंडळींच्या सहाय्याने घळ साफसूफ केली आणि १९३३ चैत्र पौर्णिमेला मारुती स्थापना केली व तेथे नित्यपूजेची व्यवस्था केली.
इ.स. १९६० पर्यंत पुन्हा ही घळ दुर्लक्षित राहिली. कारण सज्जनगड, चाफळ अशी संप्रदायाची तीर्थे समजली जाणारी स्थाने ‘कोर्ट ऑफ वॉर्डस्कडे’ होती. इ.स. १९५० साली प.प. श्रीधरस्वामी यांच्या प्रेरणेने गडावरील स.भ. अण्णाबुवा, स.भ. दिनकरबुवा आणि स.भ. बाबुराव वैद्य, स.भ. माधवराव हिरळीकर यांनी एकत्र येऊन समर्थ संप्रदायाच्या जीर्णोद्धारासाठी ‘श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड’ ही संस्था स्थापन केली. प्रथम सज्जनगड, चाफळ, टाकळी येथील अत्यावश्यक गोष्टींचा जीर्णोद्धार केला. नंतर इ.स. १९५९ साली भोर येथील स.भ. नारायण विनायक देव यांचा एक लेख सकाळमध्ये आला होता. शिवथरघळीचा जीर्णोद्धार व श्री दासबोध त्रिशतसांवत्सरिक उत्सवासाठी त्यात आवाहन केले होते. श्रीसमर्थ सेवा मंडळाने ‘सज्जनगड’ मासिकात त्या लेखाचे पुनर्मुद्रण केले; आणि शिवथरघळीच्या जीर्णोद्धाराचा संकल्प केला. इ.स. १९६० साली, स.भ. दिनकरबुवा, स.भ. माधवराव हिरळीकर, स.भ. बाळकृष्णबुवा कुलकर्णी, स.भ. विश्वनाथराव पारखी व महाडचे स.भ. धोंडोपंत वैद्य (आप्पा वैद्य) यांनी शिवथरघळीची पहाणी करुन व अपार कष्ट घेऊन आवश्यक ती डागडुजी केली. स्थानिक भक्तांनी श्रमदानाने घळीपर्यंत रस्ता तयार केला.
इ.स. १९६० माघ शुद्ध नवमीला, ‘श्रीसमर्थ सेवा मंडळाने’ अनेक समर्थभक्तांच्या उपस्थितीत शिवसमर्थांच्या वास्तव्याने, पावन झालेल्या त्या ग्रंथराज दासबोधाच्या जन्मभूमीत कल्याणस्वामी व श्रीसमर्थ यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना थोर समर्थभक्त प.प. श्रीधरस्वामी यांच्या हस्ते केली. या प्रसंगी, अशा दुर्गम स्थानी सुमारे १५००० समर्थभक्त उपस्थित होते. श्रीधरस्वामींनी त्या प्रसंगी महाराष्ट्र धर्म या विषयावर प्रवचन करुन समर्थ कार्याची माहीती सांगितली. हजारो लोकांना अन्नदान झाले. अनेकांची हृदये आनंदाने उचंबळून आली. त्या दिवसापासून प्रतिवर्षी माघ शुद्ध नवमीस ‘श्रीमत् दासबोध जयंतीचा’ उत्सव सुरु झाला. त्या आनंदात महाड येथील समर्थभक्त श्री. पांडुरंग त्र्यंबक परांजपे यांनी, ‘शिवथरघळ श्रीसमर्थ सेवा मंडळाला’ बक्षिसपत्राद्वारे अर्पण केली. मूर्तीस्थापनेनंतर पूजेअर्चेसाठी त्या दुर्गम स्थानात हिंस्त्र श्वापदांच्या सान्निध्यात कोणी रहावयाचे ? पण कराड येथील समर्थभक्त श्री. नारायणबुवा पोतनीस व श्री. महादेव नारायण बेंद्रे यांनी मोठ्या श्रद्धेने ते धाडस केले. त्यांना रहाण्यासाठी लोखंडी गज असलेला पिंजरा तयार केला होता. ते पिंजऱ्यात रहात व वाघ बाहेरुन हिंडत असे. या घळीत नंतर मार्च १९६१, चैत्र शुद्ध चतुर्थी या दिवशी, श्रीरामपंचायतनाची स्थापना स.भ. माधराव हिरळीकर कुटुंबाच्या हस्ते झाली. या मूर्ती जयपूर येथून मागविण्यात आल्या होत्या. इ.स. १९६३ साली पांच खोल्यांचा साधकाश्रम बांधला. घळीला सुरक्षिततेसाठी लोखंडी रेलिंग केले.
श्रीसमर्थ सेवा मंडळातर्फे ‘श्री शिवथरघळ सुंदरमठ सेवा समिती’ स्थापन झाली. श्री. आप्पासाहेब पारखी या समितीचे अध्यक्ष होते. स. भ. इंदिराबाई परांजपे या खजिनदार होत्या. श्री. रा. ना. तथा बन्याबापू गोडबोले यांच्या १० वर्षांच्या अथक प्रयत्नाने सोनेभाऊकडून घाटात येणारा व बारसगांवमार्गे घळीत जाणारा रस्ता अशा दोन्ही रस्त्यांस शासनाची मंजुरी मिळून रस्त्याचे काम पूर्ण झाले. आजही याच रस्त्याने शिवथरघळीत जाता येते. नंतर घळीत वीजही नव्हती. नवीन वीजेचे कनेक्शन घेतले, पाण्याची सोय केली. इ.स. १९६१ ते १९६४ पर्यंत महाड येथील स.भ. श्री. धोंडो वासुदेव तथा आप्पा वैद्य यांनी शिवथरघळीत दासबोध अभ्यास वर्ग घेतले. सध्या हे अभ्यास वर्ग चाफळ येथे सुरु आहेत. १९६८ साली विजयादशमीच्या मुहूर्तावर तेथे समर्थ गुरुकुलाची स्थापना झाली. वे.शा.सं. धायगुडेशास्त्री हे ती पाठशाळा चालवित असत. त्यानंतर ती पाठशाळा कसबा पेठ, पुणे येथे वे.शा.सं. बाळशास्त्री पारखी चालवित असत. आप्पा वैद्यांच्या दासबोध अभ्यास वर्गातून प्रेरणा घेऊन इ.स. १९७८ साली श्री. द्वा. वा. केळकर यांनी पत्रद्वारा दासबोध अभ्यास हा उपक्रम सुरु केला. ऑगस्ट १९८५ मध्ये, भारतीय संस्कृतीची जोपासना व्हावी म्हणून, शिवथरघळीत ‘समर्थ विद्यापीठाची’ स्थापना झाली. आप्पा वैद्य यांच्या पश्चात महाडचेच आणखी एक समर्थभक्त श्री. बाळासाहेब तथा मामा गांगल यांनी शिवथरघळीच्या कार्याला वाहून घेतले. बाल, युवा व प्रापंचिक शिबीरे सुरु केली. त्यांनी वेगवेगळ्या योजना राबवून निधी जमा केला व त्या निधीतूनच कल्याण मंडप, स्वयंपाकगृह वगैरे बांधकामे शिवथरघळीत केली. अंबरनाथच्या समर्थभक्त आक्काताई वेलणकर यांनी प्रसार केलेल्या सखोल दासबोध अभ्यासाचे शिबीर शिवथरघळीतच चालते. २० मार्च २००१ रोजी शिवथरघळीत श्रीसमर्थ व कल्याणस्वामींच्या मूर्तींना धक्का न लावता श्रीरामपंचायतनाच्या नवीन मूर्तींची प्रतिष्ठापना झाली; व सभोवती काचा बसविण्यात आल्या.
‘श्रीमत् दासबोधाचा’ प्रसार ‘श्रीसमर्थ सेवा मंडळाच्या’ विविध उपक्रमांतून खूपच झाल्यामुळे आणि तेथील निसर्गरम्य वातावरण आणि प्रचंड जलप्रपात पहाण्याच्या निमित्ताने आज ही ‘शिवथरघळ’ अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. आज श्रीसमर्थ सेवा मंडळाची उपसमिती असलेल्या ‘सुंदरमठ सेवा समिती’ या संस्थेतर्फे शिवथरघळीत येणाऱ्या भक्तांच्या निवासाची सोय केली जाते. सध्या शिवथरघळीत जुन्या कार्यकर्त्यांनी सुरु केलेली ‘शिबीरे’, ‘अभ्यास वर्ग’, ‘दासबोध जयंती उत्सव’ इत्यादी उपक्रम नवीन पिढीतल्या कार्यकर्त्यांनी तितक्याच उत्साहाने सुरु ठेवले आहेत. समर्थभक्त नानासाहेब देव इ.स. १९५८ साली श्रीसमर्थ चरणी लीन झाले. पण श्रीसमर्थ सेवा मंडळाने घळीचा जीर्णोद्धार करुन त्यांचे स्वप्न साकार केले.
स.भ. योगेशबुवा रामदासी
सज्जनगड
दिनांक - २०/१२/२०१५
लोकांना समर्थांची आणि त्यांच्या तत्वज्ञानाची ओळख व्हावी, समर्थभक्तीने लोककल्याण व्हावे, सर्वत्र ‘जय जय रघुवीर समर्थ’ घोष गर्जावा अशा उद्देशाने, पहिला पादुका प्रचार दौरा आयोजित केला.
Time: 8:30am - 9:00am
Time: 8:30am - 9:00am
Time: 8:30am - 9:00am
Time: 8:30am - 9:00am