छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सदगुरूस विश्रांती मिळावी या हेतूने श्री समर्थांसाठी सज्जनगडावर मठ बांधून दिला आणि गडाची उत्तम व्यवस्था राखण्याचे आदेश दिले. इ.स. १६७६ साली समर्थ कायमस्वरुपी सज्जनगडावर वास्तव्यासाठी आले. गडाच्या रक्षणासाठी समर्थांनी दक्षिणेकडे मारुतीची स्थापना केली. हा धाब्याचा मारुती म्हणून प्रसिद्ध आहे. गडाच्या पूर्वेस अंगापूरच्या डोहात सापडलेल्या महिषासुरमर्दिनीची (अंगलाई देवीची) स्थापना केली.
या गडावर समर्थांचे वास्तव्य शेवटची सहा वर्षे होते. इ.स. १६८२ जानेवारीला समर्थांनी सज्जनगडावर देह ठेवला. ज्या ठिकाणी समर्थांना अग्निसंस्कार केला त्या ठिकाणी तळघरात समाधी मंदिर व त्यावर राममंदिर, छत्रपती संभाजीराजांनी बांधले. समर्थांच्या पश्चात अक्कास्वामी व दिवाकर गोसावी यांनी सज्जनगड व चाफळ येथील कारभार सांभाळला. त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी इ.स. १७१० माघ शुक्ल पंचमी या दिवशी श्री समर्थांचे थोरले बंधू श्रेष्ठ गंगाधर यांचे नातू गंगाधरबुवांना सज्जनगडावर आणून चाफळ व सज्जनगडाचा कारभार त्यांच्या स्वाधीन केला. इ.स. १८४७ पर्यंत पुत्रपरंपरेने कारभार चालला.
महारुद्र स्वामींना पुत्र नसल्यामुळे त्यांनी लक्ष्मणस्वामींना दत्तक घेतले. तेव्हापासून दत्तक परंपरेने सज्जनगडाचा कारभार सुरु झाला. याच सुमारास इ.स. १८४८ ला छत्रपतींचे सातारा येथील राज्य खालसा होऊन इंग्रजांची सत्ता सुरु झाली. यामुळे राजघराण्याचे चाफळ व सज्जनगडाकडे दुर्लक्ष झाले. देवस्थानाचे उत्सव व नैमित्तिक कार्य याकरीतादेखील पैसा अपुरा पडू लागला. मठाची दुर्दशा होऊ लागली.इ.स. १९०१ च्या दरम्यान इतिहासाचार्य राजवाडे यांनी " रामदास " हा निबंध प्रकाशीत केला, यामुळे समर्थांच्या अभूतपूर्व राष्ट्रीय कार्याचे ज्ञान समाजास झाले. धुळ्याचे स.भ. नानासाहेब देव यांचे या निबंधाकडे लक्ष वेधून समर्थांचे अप्रसिद्ध वाङ्मय छापण्याचा देवांनी संकल्प केला. त्यानंतर त्यांनी डोंमगाव येथे जाऊन कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरातील दासबोधाच्या मूळ प्रती वरून दुसरी प्रत तयार केली आणि ती तपासून १९०५ साली रामदास-रामदासी या मालिकेतील पहिला भाग म्हणून सटीप दासबोध छापला. १९०४ पासून त्यांनी अथक प्रयत्न करून समर्थ सांप्रदायाच्या मठांचे संशोधन केले आणि समर्थ सांप्रदायाचा वाङ्मयीन ठेवा ( हस्त लिखिताची बाडे ) गोळा केला. अप्रकाशित वाङ्मयाच्या प्रकाशनाला सुरुवात केली. यामुळे समर्थ कृत वाङ्मय लोकांसमोर आले. समर्थ सांप्रदायीक स्थानांचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून भारत भर प्रवचने करून १९३२ साली समर्थांच्या जन्म स्थानी जांब येथे नाना साहेब देवांनी समर्थ मंदिर बांधले आणि ते ट्रस्टच्या हवाली केले. 1935 साली समर्थ वाग्देवता मंदिर धुळे येथे उभे केले व त्यात समर्थ सांप्रदायाचा वाङ्मय़ीन ठेवा जतन केला. १९३९ साली समर्थ सांप्रदायाच्या जीर्णोद्धारासाठी ठिकठिकाणी समर्थ संघ निर्माण केले. समर्थ सांप्रदायाला ऋणी करून १९५८ साली नाना साहेब देव समर्थपदी लीन झाले.
स.भ. नानासाहेब देवांच्या या कार्या प्रमाणेच वाईच्या गोजीवन चौंडे महाराज यांनी 1901 साला पासून सज्जनगडाच्या परिसरात कीर्तने व भजने करून समर्थ सांप्रदायाचा प्रसार केला. गोरक्षण कार्याबरोबर त्यांनी भारत भर कीर्तने करून सांप्रदायाच्या जीर्णोद्धाराला आर्थीक मदत केली. गोजीवन स.भ. चौंडे महाराजांच्या प्रयत्नातून 1918 पासून दासनवमी उत्सवास डोंमगाव, टाकळी, मीरज , रायगड येथून सज्जनगडावर पालख्या येऊ लागल्या.
१९२७ साली श्रीधर स्वामी सज्जनगडावर आले आणि समर्थांची सर्व प्रकारे सेवा करून, व साधना करून समर्थ कृपा संपादन केली. १९३० साली कर्नाटकात गेलेव तेथे समर्थ सांप्रदायाचा प्रसार केला. १९३५ साली ते पुन्हा गडावर आले तेव्हा दिनकर बुवा, अय्याबुवा, दत्ताबुवा असे साधने करिता आलेले रामदासी त्यांच्या भोवती गोळा झाले. ही सर्व रामदासी मंडळी जमेल तशी समर्थ सेवा निस्पृहपणे करीत होती. त्यावेळी सज्जनगडावरील देवस्थानाची व्यवस्था समाधानकारक नव्हती, कारण इ.स. १९२८ सालापासून बापूसाहेब स्वामींनी पुत्रांतील कलहामुळे व संस्थानला कर्ज झाल्यामुळे संस्थानचा कारभार कोर्ट ऑफ वॉर्डस्कडे सोपविला होता. देवालयांचे व वास्तूंचे दैन्य अनेकांना विषण्ण करीत होते. त्यावेळी साधनेसाठी येऊन राहिलेले दिनकरबुवा, अय्याबुवा, दत्ताबुवा, अण्णाबुवा असे अनेक रामदासी एकत्र येऊन १९३९ साली नानासाहेब देवांच्या प्रेरणेने सज्जनगडावर "समर्थ संघाची शाखानिर्माण झाली. या रामदासींना माध्यान्हीच्या जेवणाची सोय नव्हती. हे रामदासी एक-दोन दिवसांनी गडाखालील खेडेगावांमधून भिक्षा आणून स्वयंपाक करून समर्थांना नैवेद्य दाखवित असत. इ.स. १९४७-४८ च्या दरम्यान उद्योगपती समर्थभक्त बाबुराव वैद्य, सातारा हे गडावर आले व समर्थपूजेतील जीर्ण उपकरणे पाहून येथील जीर्णोद्धार करण्याचा त्यांनी संकल्प केला. येथील दिनकरबुवा वगैरे रामदासींना घेऊन विचार विनिमय केला व समर्थसेवेकरीता एक मंडळ निर्माण करण्याचे ठरविले. मंडळाची घटना तयार करून दिनांक ९ जानेवारी १९५० रोजी प.पू. श्रीधरस्वामींचा आशीर्वाद घेऊन श्री समर्थ संप्रदायाच्या जीर्णोद्धारासाठी "श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड" ही संस्था स्थापन करून कायद्यानुसार रजिस्टर्ड केली. "श्री समर्थांच्या कार्याचा, तत्वज्ञानाचा, वाङ्मयाचा प्रसार सर्वत्र करून श्री समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सर्व स्थानांचे नंदनवन करा, समर्थ तुमच्या पाठीशी आहेत " असा आशीर्वाद श्री श्रीधर स्वामींनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना दिला. समर्थ सेवेचा आदर्श श्रीधर स्वामींनी घालून दिला होताच, त्या आदर्शा प्रमाणे मंडळाचे निस्पृह कार्यकर्ते सज्जनगडाचा काया पालट करण्या करीता झटू लागले.
निवास व्यवस्थेसाठी नोंद करून खोलीची चावी घ्यावी.
निवास, भोजनप्रसाद, चहा, नाष्टा, स्नानासाठी गरम पाणी ही सर्व व्यवस्था
श्री समर्थ सेवा मंडळातर्फे विनामूल्य केली जाते.
ऐच्छिक ‘देणगी सेवा’ मंडळाच्या कार्यालयात स्विकारली जाते व त्याची पावती दिली जाते.
'श्री समर्थ सेवा मंडळाचे' मुख्य कार्यालय आपण सज्जनगडाच्या पायऱ्या चढून सपाटीवर आल्यावर लगेचच डाव्या
हाताला आहे. आपल्या निवास व्यवस्थेसाठी तसेच अधिक माहितीसाठी तेथे संपर्क करावा.
श्रीसमर्थ सेवा मंडळाचे मुख्य कार्यालय सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत उघडे असते.
आपल्या आप्तांच्या नावे अभिषेक, अन्नदान इ. करता येते.
लोकांना समर्थांची आणि त्यांच्या तत्वज्ञानाची ओळख व्हावी, समर्थभक्तीने लोककल्याण व्हावे, सर्वत्र ‘जय जय रघुवीर समर्थ’ घोष गर्जावा अशा उद्देशाने, पहिला पादुका प्रचार दौरा आयोजित केला.
Time: 8:30am - 9:00am
Time: 8:30am - 9:00am
Time: 8:30am - 9:00am
Time: 8:30am - 9:00am