श्री समर्थ रामदास स्वामींचे पूर्वज कृष्णाजीपंत ठोसर हे दुष्काळ व राज्यक्रांतीमुळे बेदर प्रांत सोडून शके 884 ( इ.स. 962) साली गोदावरीतीरी हिवरे येथे येऊन राहिले. यांना पांच पुत्र होते. शेवटचा पुत्र दशरथपंत याने कसबे जांब हे गांव वसविले व स्वपराक्रमाने बाजूच्या बारा गावांचे कुलकर्णीपद मिळविले. हे रामोपासक व वैराग्यशील होते. कृष्णाजीपंतांपासून श्री समर्थांचे वडील सूर्याजीपंत हे तेविसावे पुरुष, यांचा जन्म शके 1490 (इ.स. 1568) साली जांब गांवी झाला. हे सूर्याची व रामाची उपासना करीत. रामनवमी उत्सव करीत.यांची पत्नी राणूबाई सुशील, धर्माचरणतत्पर व वैराग्यशील पतिव्रता होती. या दोघांना सूर्याच्या कृपेने शके 1527, मार्गशीर्ष शुक्ल 3 (इ.स. 1605) या शुभदिनी प्रथम पुत्र झाला. त्याचे नांव गंगाधर ठेवले. हे गृहस्थाश्रमी होते. हे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण, गोत्र - जमदग्नी, सूत्र - आश्वलायन. श्रेष्ठ गंगाधर यांचे लग्न शके 1534 (इ.स. 1615) साली झाले. यांना प्रत्यक्ष रामाचा अनुग्रह होता. शके 1537 (इ.स. 1516) ला सूर्याजीपंत परंधामास गेल्यावर कुटुंबाची सर्व जबाबदारी श्रेष्ठांनी सांभाळली.
ते गृहस्थाश्रमी असले तरी सत्वशील, सदाचारसंपन्न व भक्तिज्ञान वैराग्याने परिपूर्ण होते. यांचे भक्तिरहस्य व सुगमोपाय हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. सूर्याजीपंतांच्या निधनानंतर श्रेष्ठ गंगाधरपंत लोकांना अनुग्रह देत असत. श्रेष्ठांच्या जन्मानंतर सूर्याजीपंतांना रामकृपेने शके 1530 - चैत्र शुक्ल 9 - रामनवमी (इ.स. 1608) या शुभमुहूर्तावर दुसरा पुत्र झाला. त्याचे नांव नारायण ठेवले. हे नारायण सूर्याजीपंत ठोसर म्हणजेच श्री समर्थ रामदास स्वामी.
वयाच्या पाचव्या वर्षी नारायणाची मुंज झाली. बुद्धी तीव्र असल्यामुळे त्याचे प्राथमिक अध्ययन संस्कृतासह लवकर झाले. अध्ययनाबरोबरच सूर्यनमस्कार मल्लविद्या यांचा अभ्यास करून नारायणाने अचाट शरीरसामर्थ्य मिळविले. बालपणी नारायण फार हूड व खोडकर होता. त्याला मुलांबरोबर गोट्या खेळणे, रानावनात हिंडणे, झाडावर चढणे, पाण्यात डुंबणे आणि एकांतात जाऊन बसणे असे छंद होते. " समर्थ प्रतापात " गिरीधर स्वामी म्हणतात -
सर्वकाळ सवंगड्यांबरोबर नारायणाचे हिंडणे राणूबाईंना आवडत नसे. एकदा त्या रागावून नारायणाला म्हणाल्या, "नारोबा, पुरुषांना काहीतरी संसाराची काळजी पाहिजे." हे शब्द ऐकून सर्वांच्या नकळत नारायण अडगळीच्या खोलीत जाऊन बसला व आसनात बसून चिंतनात मग्न झाला. सगळीकडे शोधाशोध झाली. राणूबाईंना फार काळजी वाटली. काही कामानिमित्त राणूबाई त्या अडगळीच्या खोलीत गेल्या, तेव्हा नारायणाचा पाय लागून दचकल्या. नारायण आहे असे समजतांच त्या म्हणाल्या, "नारोबा, येथे अंधारात काय करतोस ?" त्यावर नारायणाने उत्तर दिले, "आई, चिंता करीतो विश्वाची" - (समर्थ प्रताप २ - २२). एकदा घरी काही कार्यक्रम होता. त्यासाठी ताकाची गरज होती. हे नारायणाला समजताच त्याने कुंभाराकडून ११ गाडगी आणून ११ घरांतून ताक मागितले व पहाटेच ती सर्व गाडगी ताकाने भरून स्वयंपाकघरात आणून ठेवली. सकाळी राणूबाई पाहतात तो जिकडे तिकडे ताकच ताक दिसले. याप्रमाणे नारायणाच्या अचाट बुद्धीच्या, शक्तीच्या व दैवी कृपेच्या अनेक बाललीला चरित्रकारांनी वर्णिल्या आहेत.
एके दिवशी नारायणाने आपणाला अनुग्रह द्यावा असा हट्ट श्रेष्ठ गंगाधरांकडे धरला तेव्हा, तुझे वय लहान आहे, आताच गडबड करू नकोस असे श्रेष्ठ म्हणाले. म्हणून नारायणाने रुसून मारुती मंदिरात जाऊन अनुष्ठान केले. मारुतीकृपेने नारायणाला श्रीराम दर्शन झाले व प्रभू रामचंद्राने प्रत्यक्ष अनुग्रह करून श्रीराम जयराम जयजय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा उपदेश केला. अनुग्रह झाल्यावर नारायण मौनव्रत धारण करून एकांतात राहू लागला. राणूबाईंनी त्याचे लग्न करायचे ठरवले. या गोष्टीला नारायण मान्यता देईना. तेंव्हा अंतरपाट धरीपर्यंत बोहोल्यावर उभे राहण्याची शपथ घालून वचनबद्ध करून घेतले. नंतर जवळच असलेल्या आसनगांवच्या भानजीपंत बोधलापूरकर (राणूबाईंचे बंधू) यांची मुलगी वधू म्हणून निश्चित केली. गोरज मुहूर्तावर लग्न ठरले. सर्व मंडळी जांबेहून आसनगांवला आली. वर वधू यांस समोरासमोर उभे करून अंतरपाट धरला व ब्राह्मण मंगलाष्टके म्हणू लागले. "शुभमंगल सावधान" चा घोष झाला. सावधान शब्दाने सावध झालेला नारायण विश्वप्रपंच करण्यासाठी लग्नमंडपातून पळाला. नारायणाचा शोध लागत नाही असे पाहून त्या वधूचे श्रेष्ठांच्या माहितीतल्या दुस-या वराशी त्याच दिवशी लग्न झाले. नारायण सर्वसंग परित्याग करून शके 1541 (इ.स. 1620) फाल्गुन शुक्ल अष्टमीस लग्नमंडपातून पळाला व गोदावरी पार करून 22 दिवसांनतर चैत्र शुद्ध प्रतिपदेस नाशिक पंचवटी येथे राममंदिरात आला.एवढ्या लहान वयात माता, बंधू, घर यांचा त्याग करून तपश्चर्येचे ध्येय ठेवणे ही सामान्य गोष्ट नव्हती. मोरोपंत म्हणतात -
अवघ्या बाराव्या वर्षी जगदोद्धाराकरीता लग्नमंडपातून पळून गेल्याचे दुसरे उदाहरण इतिहासात आढळून येत नाही.
वयाची १२ वर्षे पूर्ण होतांना नारायणाला एका श्रीरामावाचून अन्य कोणी जिवलग उरले नव्हते. नाशिक पंचवटीतील श्रीराम मंदिरात नारायणाने प्रवेश केला तेव्हा रामनवमीचा उत्सव सुरु होता. मंदिरात मानसपूजा व प्रार्थना केली. सामर्थ्य मिळवल्याशिवाय समाजोद्धाराचे कार्य तडीस नेणे अशक्य आहे हे जाणून खडतर तप:श्चर्येचा संकल्प केला आणि रामाची आज्ञा घेऊन आपल्या तप:श्चर्येस योग्य असे स्थान निवडले.
नाशिकपासून जवळच पूर्वेस टाकळी हे गांव आहे. तेथे गोदावरी व नंदिनी या दोन नद्यांचा संगम आहे. तप:श्चर्येस हे स्थान अनुकूल आहे असे पाहून तेथेच एका गुहेत नारायणाने वास्तव्य केले. तपश्चर्येच्या काळातील दिनचर्या-
रोज संगमावर प्रत:स्नान करून संध्या, नमस्कारादी नित्यकर्मे सूर्योदयापूर्वीच करणे. गायत्री पुरश्चरणानंतर सूर्य माथ्यावर येईपर्यंत संगमस्थानी कंबरभर पाण्यात उभे राहून श्रीराम जयराम जयजय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप करणे. दुपारी पंचवटीत जाऊन माधुकरी मागून टाकळी येथे येऊन भोजन करणे. थोडा वेळ विश्रांती घेऊन ग्रंथावलोकन करणे. नंतर पंचवटीत कीर्तन व पुराणश्रवणास जाणे. संध्याकाळी टाकळीत येऊन आन्हिक आटोपून विश्रांती घेणे. एकच वेळ भोजन व उरला वेळ अनेक ग्रंथांचे अध्ययन आणि वाल्मिकी रामायणाचे लेखन व नामस्मरण याप्रमाणे अव्याहत १२ वर्षे नेम चालू होता. इतक्या लहान वयात अशी खडतर तप:श्चर्या करीत असताना तत्कालीन समाजाकडून त्याला बराच त्रास सहन करावा लागला. यातूनच "अनुदिनी अनुतापे तापलो रामराया" अशी करुणाष्टके प्रगटली.
तप:श्चर्येची तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर रामकृपेने त्याने दशपंचक गांवच्या गिरिधरपंत कुलकर्णी यांचे प्रेत उठवले व त्यांना दहा पुत्र होतील असा वर दिला. तेव्हापासून त्यांचे आडनांव दशपुत्रे झाले. या लोकविलक्षण घटनेनंतर नारायणास लोक "समर्थ" म्हणू लागले. गिरिधरपंतांचा पहिला मुलगा उद्धव समर्थकृपेने झाला म्हणून समर्थांस अर्पण केला. हा समर्थांचा पहिला शिष्य. याची मुंज समर्थांच्या मांडीवर झाली. नंतरच्या काळात समर्थांचा नावलौकिक सर्वत्र पसरला पण समर्थ प्रसिद्धीपासून आलिप्त राहिले. बारा वर्षांचा पुरश्चरणाचा काळ संपला. जपसंकल्प पुरा झाला. नंतर रामाचीआज्ञा घेऊन समर्थ तीर्थाटनास निघाले. त्यावेळी उद्धवाचे वय ८ वर्षाचे होते. त्याने बरोबर येण्याचा हट्ट धरला, पण त्याला कष्ट झेपणार नाहीत म्हणून त्याच्यासाठी टाकळी येथे गोमयाचा मारुती स्थापन करून त्याची प्राणप्रतिष्ठा केली. या मारुतीची पूजा करून भिक्षा मागावी व पुरश्चरण करावे, असे उद्धवास सांगून त्याला अनुग्रह दिला. टाकळी हा समर्थस्थापित पहिला मठ व पहिला मारुती. उद्धव हा पहिला मठपती (इ.स. १६३२). आपण परत येऊ असे सांगून रामाचे दर्शन घेऊन समर्थांनी तीर्थयात्रेस प्रारंभ केला.
भारताची सर्व भूमीच तीर्थरूप आहे. काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत व द्वारकेपासून जगन्नाथपुरीपर्यंत भारताच्या चारी दिशांना तीर्थक्षेत्रांची दाटी आहे. समर्थ स्वत:च दासबोधात म्हणतात-
ऐन तारुण्याचा काळ, त्यात १२ वर्षाच्या तप:श्चर्येने बाणलेल्या प्रखर ज्ञान वैराग्याचे तेज, सूर्योपासनेने सुदृढ झालेली देहयष्टी आणि अनन्य भक्तिने अंत:करणात वसलेली कृपादृष्टी असे हे समर्थांचे व्यक्तिमत्व पाहून अनेक जण प्रभावित झाले. त्यापैकी काही निवडक लोकांना अनुग्रह देऊन उपासनेस लावले. विवेक विचाराचे ज्ञान देऊन त्यांना कर्तव्यतत्पर केले. हे करीत असताना समाजाची वागण्याची त-हा, समाजात चाललेल्या उपासना पद्धती, समाजाची मन:स्थिती यांचे परीक्षण समर्थांनी केले. परकीय सत्तांनी देशात घातलेला धुमाकूळ आणि त्यामुळे लोकांची झालेली दैन्यावस्था पाहून समर्थांचे मन व्यथित झाले. परकीयांचे सामर्थ्य कोणते व आमच्या समाजाचे दैन्यत्व कोणते व त्यावर कोणता उपाय लागू पडेल याचा विचार समर्थांनी तीर्थाटनाच्या काळात केला. आणि त्याच्यावर नियोजन करून अंमलात आणण्यासाठी भारतात अनेक ठिकाणी मारुतीस्थापना करून लोकांना जागृत करण्याचे कार्य केले. समर्थांनी महत्वाची सर्व तीर्थक्षेत्रे अवलोकन केली व त्या त्या ठिकाणी संत महंतांच्या भेटी घेतल्या. अशा रितीने १२ वर्षांची तीर्थयात्रा पूर्ण झाल्यावर समर्थ गोदावरीकाठी आले. पैठण येथे कीर्तन केले आणि जांब येथे जाऊन आपल्या मातोश्रींचे दर्शन घेतले. २४ वर्षांनंतर आपला मुलगा परत आलेला पाहून राणूबाईंना अपार आनंद झाला. थोडे दिवस घरी मुक्काम करून व आईचा निरोप घेऊन समर्थ पुन्हा नाशिक पंचवटीस आले व श्रीराम दर्शन घेऊन टाकळीला येऊन उद्धवास भेटले. दोघांना अपार आनंद झाला. आपल्या जगदोद्धाराच्या कार्यासाठी समर्थांनी कृष्णाकाठचा प्रदेश तीर्थाटनातच निवडून ठेवला होता. त्याप्रमाणे उद्धवाचा निरोप घेऊन पुढील कार्यासाठी समर्थांनी प्रस्थान केले.
श्री समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रातील कृष्णाकाठ आपल्या कार्यास निवडला कारण इतर स्थळांपेक्षा येथे थोडी शांतता होती. कार्यास सुरुवात करताना परिस्थितीचा आढावा घेणे, चांगले कार्यकर्ते शोधणे, कोणते कार्य कोणाकडून व कोठे करायचे, कसे करायचे याचा आराखडा तयार करणे व ते अंमलात आणणे याचा पूर्ण विचार करून समर्थ प्रथम महाबळेश्वर येथे आले. तेथे चार महिने राहिले. तेथे मारुतीची स्थापना करून दिवाकर भट व अनंत भट यांना अनुग्रह दिला. वाई येथे मारुतीस्थापना करून पिटके, थिटे, चित्राव यांना अनुग्रह दिला नंतर माहुली व जरंडेश्वर येथे काही दिवस राहीले. शहापूर येथे सतीबाई शहापूरकर यांना अनुग्रह देऊन त्यांच्यासाठी चुन्याचा मारुती स्थापन केला. समर्थ स्थापित ११ मारुतीतील शहापूरचा हा पहिला मारुती. यानंतर क-हाड, मिरज, कोल्हापूर या भागात अक्का, वेण्णा, कल्याण व दत्तात्रेय हे शिष्य समर्थांना मिळाले.
मसूर येथे मारुती स्थापन करून तेथे रामनवमी उत्सव सुरू केला. टाकळीहून उद्धवास बोलावले. शिष्यपरिवार वाढल्यानंतर राममंदिर बांधावयाचे ठरले. त्याकरीता चाफळ येथील स्मशानभूमीची जागा गावक-यांनी दिली. इ.स. १६४८ साली चाफळ येथील राममंदिरात रामनवमी उत्सव सुरु झाला. अंगापूरच्या डोहात सापडलेल्या रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना चाफळ येथील मंदिरात करून रामाच्या पुढे दासमारुती व मागे प्रतापमारुती स्थापन केला व शिष्यांना रहाण्यासाठी तेथेच कुटी उभारली. याप्रमाणे हनुमान उपासना व रामोपासना सुरु केली. इ.स. १६४९ साली शिंगणवाडीच्या बागेत शिवाजी महाराजांना अनुग्रह दिला, त्यांच्याबरोबर निळो सोनदेव व बाळाजी आवजी चिटणीस यांनाही अनुग्रह दिला. उंब्रज येथे मारुतीस्थापना करून समर्थ पंढरपूर येथे गेले. तेथे तुकाराम महाराजांची भेट झाली. परत येताना मेथवडेकर यांना अनुग्रह दिला. चाफळ येथील मठाचे कार्य दिवाकर गोसावींकडे सोपवले. माजगांव येथे मारुतीस्थापना करून समर्थ दासबोध लिखाणास शिवथरघळ येथे गेले.
इ.स. १६५० साली अनेक संतांच्या भेटी घेतल्या. जयरामस्वामी वडगांवकर, रंगनाथस्वामी निगडीकर, आनंदमूर्ती ब्रह्मनाळकर व केशवस्वामी भागानगरकर हे सर्व समर्थांना मानीत. समर्थांसह हे चार मिळून दासपंचायतन. यांच्या आपापसात वारंवार भेटी होत. इ.स. १६५२ साली समर्थ रामनवमी उत्सवासाठी जांबेत गेले. तेथून ते मातापूरला गेले. प्रवासात काही ठिकाणी मठस्थापना केली. इंदूरबोधन (निजामाबाद) येथे मठस्थापना करून उद्धवस्वामींना मठपती केले. परत येताना तिसगांव येथे वृद्धेश्वराच्या मंदिरात गुरुप्राप्तीसाठी पुरश्चरण करणा-या भिंगारच्या दिनकर पाठक (स्वानुभव दिनकरकर्ते) यांना अनुग्रह दिला व चाफळ येथे रामनवमीस आले. इ.स. १६५५ साली श्री समर्थांच्या मातोश्री राणूबाई परंधामास गेल्या. त्यानंतर समर्थ रामेश्वर येथे गेले. वाटेत मिरज येथे जयरामस्वामींना त्रास देणा-या दिलेरखानास वठणीवर आणले. तो समर्थांना शरण आला व मिरज येथे मठाकरीता जागा दिली. तेथे समर्थांनी मठस्थापना करून वेणाबाईस मठपती केले. पुढे चंदावर (तंजावर) येथे शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजांना अनुग्रह देऊन मठस्थापना केली व तेथे भीमस्वामींना मठपती केले. नंतर रामेश्वर, उडपी, तोरगल या मार्गाने चाफळ येथे आले. इ.स. १६५६ साली वामन पंडित यांनी समर्थांची भेट घेतली. त्याच वर्षी चातुर्मासात समर्थ हेळवाकच्या घळीत होते. येताना पाटणच्या चांदजीराव पाटणकर यांना अनुग्रह दिला. वडगांव येथे कृष्णाप्पांच्या पुण्यतिथीस आले व तेथेच रंगनाथस्वामींची भेट झाली. इ.स. १६५८ साली एका मोळीविक्याकडून सदाशिवशास्त्री येवलेकर यांचा गर्वपरिहार केला व त्यांना अनुग्रह देऊन त्यांचे नांव वासुदेव पंडित असे ठेवले व त्यांना कण्हेरी येथे मठ करून रहाण्यास सांगितले. त्यानंतर काही वर्षे समर्थांनी शिवथरघळ येथे राहून दासबोधादी ग्रंथांचे लेखन केले.
इ.स. १६६५ साली समर्थांची चिंचवड येथे मोरया गोसावींशी भेट झाली व तेथून चाफळला येताना वाटेत जेजुरीस खंडोबाचे दर्शन घेतले. इ.स. १६७२ चा रामनवमी उत्सव पारगांव येथे झाला. त्याकरीता चाफळ येथील राममूर्ती पारगांव येथे आणल्या. इ.स. १६७३ साली शिवाजी महाराज रायगडावरून पन्हाळ्यास येत असताना पोलादपूर येथे समर्थांची भेट झाली. नंतर समर्थही पन्हाळ्यास आले. तेथे रामचंद्रपंत अमात्य यांच्या घरी कीर्तन केले. इ.स. १६७४, ज्येष्ठ शुक्ल १३ या दिवशी गागाभट्टांकडून शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला व श्री समर्थांनी मनात योजलेले आनंदवनभूवनाचे स्वप्न साकार झाले. राज्याभिषेका नंतर शिवाजी महाराजांनी कुटुंबासह समर्थांचे दर्शन घेतले. अनेक गोष्टींची चर्चा केली. महाराज रायगडी परत आले व कोंडो नारायण यांस समर्थांची दिनचर्या कळविण्यास सांगितले. चातुर्मासात समर्थ हेळवाकच्या घळीत असताना तेथे शीतज्वराने आजारी पडले. त्यावेळी दिवाकर गोसावींचे व्याही रघुनाथ भट यांनी समर्थांची सेवा केली. या रघुनाथ भटांना समर्थांनी स्वहस्ते पत्र लिहिले, ते समर्थ कृत एकमेव गद्य लेखन. इ.स. १६७५ साली समर्थ शिवथरघळीत असताना शिवाजी महाराजांनी चाफळ मठास कर्नाटकातील चंदीसह १२१ गावांची सनद (इनाम) दिली.
इ.स. १६७६ साली शिवाजी महाराजांच्या आग्रहावरुन समर्थ सज्जनगड येथे कायमस्वरुपी वास्तव्यास आले. शिवाजी महाराजांनी समर्थांसाठी मठ बांधून दिला व हवालदार जिजोजी काटकर यांस उत्तम व्यवस्था ठेवण्यास सांगितले. इ.स. १६७८ (फाल्गुन कृष्ण १३) या दिवशी समर्थांचे मोठे बंधू श्रेष्ठ गंगाधर परंधामास गेले आणि पाठोपाठ अमावस्येला त्यांच्या पत्नीने देह ठेवला. लगेचच रामनवमी उत्सवानंतर चैत्र कृष्ण १४ या दिवशी वेणाबाईंनी सज्जनगडावर समर्थचरणी देह ठेवला. समर्थांनी उद्धव गोसावी यांना पाठवून रामजी व श्यामजी या श्रेष्ठ गंगाधरांच्या मुलांना जांब येथून आणविले. ही मुले लहान होती. त्यांना काही दिवस आपल्या जवळ ठेवून मार्गदर्शन करून इ.स. १६७८, माघ कृष्ण प्रतिपदेला उद्धवाबरोबर पुन्हा त्यांना जांब येथे पाठविले. तत्पूर्वी प्रतापगड येथील बालेकिल्ल्याच्या दाराजवळ मारुतीची स्थापना केली. हा समर्थ स्थापित शेवटचा मारुती. श्रावणात समर्थ चंदावर (तंजावर) येथे गेले. तेथे अरणीकर कारागिरास दृष्टी देऊन राममूर्ती करण्यास सांगितले. भाद्रपद महिन्यात सज्जनगडावर परत आले. मार्गशीर्ष महिन्यात कल्याणस्वामींना डोमगांव येथे मठ स्थापून रहाण्याची आज्ञा केली. जाताना त्यांच्याबरोबर चार शिष्यांना दिले. इ.स. १६७९, पौष शुक्ल ९ ते माघ शुक्ल पौर्णिमेपर्यंत शिवाजी महाराज सज्जनगडावर होते. इ.स. १६८०, चैत्र शुक्ल पौर्णिमेला रायगडावर शिवाजी महाराज परंधामास गेले. "श्रींची इच्छा" असे म्हणून समर्थांनी अन्न वर्ज्य केले.
संभाजीराजे दर्शनास येऊन गेले. त्यांना उपदेशपर पत्र लिहिले. इ.स. १६८१ साली समर्थ चाफळ येथे रामनवमी उत्सवास गेले. मार्गशीर्षात कल्याणस्वामी डोमगांवहून समर्थ दर्शनास येऊन गेले. त्यावेळी दासबोधाचा विसावा दशक पूर्ण केला. माघ वद्य पंचमी इ.स. १६८२ या दिवशी चंदावरहून व्यंकोजीराजांनी पाठविलेल्या राममूर्ती सज्जनगडावर आल्या. समर्थांनी त्यांची स्वहस्ते पूजा केली. समर्थांनी शेवटची निरवानिरव करण्यास सुरुवात केली. समर्थांचा अंतकाळ जवळ आला असे जाणून शिष्य व्याकुळ झाले. आम्ही यापुढे काय व कसे करावे असे त्यांनी विचारले असता समर्थ म्हणाले -
माघ कृष्ण ९, शके १६०३, (२२ जानेवारी १६८२) वार शनिवार दुपारी दोन प्रहरी सज्जनगडावर रामनामाचा घोष करून समर्थ रामरुपात विलीन झाले. ज्याठिकाणी श्रीसमर्थांना अग्निसंस्कार केला त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी राममंदिर व तळघरात समाधीमंदिर बांधले.त्यानंतर अक्कास्वामी व दिवाकर गोसावी यांनी सज्जनगड व चाफळ मठाचा कारभार अनेक वर्षे सांभाळला.
जय जय रघुवीर समर्थ