सज्जनगडावरील पवित्र स्थानांचे दर्शन घडावे आणि गडाची माहिती व्हावी ह्या हेतूने इ.स. १९५१ साली, ‘सचित्र सज्जनगड’ हे पुस्तक मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये प्रकाशित केले; नंतर इ.स. १९५४ पासून क्रमाने दैनंदिन उपासना, श्रीसमर्थ चरित्रामृत, मनाचे श्लोक, भीमरूपी स्तोत्रे, छोटे समर्थ चरित्र अशी पुस्तके प्रकाशित करुन, ‘श्री समर्थ सेवा मंडळाचा’ प्रकाशन विभाग सुरु झाला. भास्करबुवांनी टिपा लिहिलेला सटीप दासबोध प्रथम ‘व्होरा अँड कंपनीतर्फे’ छापला. कल्याणसेवक कृत सार्थ ‘आत्माराम’, ‘संक्षिप्त रामदासी गाथा’, ‘समर्थांचे फोटो’ इत्यादींची विक्री सज्जनगडावर व समर्थ पादुका प्रचार दौऱ्यात सुरु झाली. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य, प्रा. के.वि. बेलसरे यांनी सेवा मंडळाची विनंती मान्य करुन संपूर्ण दासबोधाचा अर्थ लिहिला. इ.स. १९७५ साली, सेवा मंडळाने ह्या दासबोधाचे प्रकाशन केले.
श्रीसमर्थ विद्यापीठाची स्थापना दासबोधाचे जन्मस्थान असणा-या शिवथरघळ (महाडजवळ), जि. रायगड, येथे आषाढ शुद्ध एकादशी शके 1908 (जुलै 1986) या दिवशी झाली. श्री. मुरलीधर दत्तात्रय उर्फ मामा गांगल यांच्या पुढाकाराने व त्यांच्या 15 - 20 कार्यकर्त्याच्या सहाय्याने हे विद्यापीठ शिवथरघळ येथे स्थापन झाले, म्हणून विद्यापीठाच्या नांवात `शिवथरघळ' असा उल्लेख आलेला आहे.
`भारतीय संस्कृती दर्शन परीक्षा' या नांवाने, प्रारंभीच्या पंचवीस वर्षांच्या कालावधीत विद्यापीठ आपल्या परीक्षा घेत असे. प्रथमा, द्वितीया, मुमुक्षू, साधक व उपासक अशी या परिक्षांची नांवे होती तसेच मनोबोध परीक्षाही घेतल्या जात असत.
विद्यापीठाचे कार्य पहिले एक तप शिवथरघळीतून चालले. परिक्षांच्या जोडीला विद्यार्थी व युवकांसाठी, प्रापंचिकांसाठी शिवथरघळीत शिबीरे घेण्याचा उपक्रमही विद्यापीठाने राबविला आहे.
सज्जनगड मासिकाच्या नोव्हेंबर 1978 च्या अंकामध्ये पत्रद्वारा दासबोध अभ्यास उपक्रमाचा पहिला लेख प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये एका समासावर 5 प्रश्न काढले होते. त्यावरील उत्तरांचा मासिकाच्या संपादकांकडे इतका ढीग पडला की त्यासाठी वेगळी योजना राबवणे गरजेचे आहे असे तत्कालिन संपादक स. भ. आण्णाबुवा कालगांवकर यांना वाटले. याकरीता डिसेंबर 1978 साली सज्जनगडावर विशेष सभा घेण्यात आली. मासिकात एक वर्षापर्यंत लेख प्रसिद्ध करण्याचे ठरले. 176 अभ्यासार्थींनी 12 स्वाध्याय पाठवून अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रशस्तिपत्रकांचे वितरण 26 डिसेंबर 1979 रोजी सज्जनगडावर श्रीसमर्थ समाधीजवळ माननीय किसन महाराज साखरे यांच्या हस्ते करण्यात आले.
श्रीधर कुटीसमोरील इतिहास संशोधक, श्री बाबासाहेब देशपांडे यांचे घर घेऊन तेथे एक मजली इमारत बांधली; वर खोल्या व खाली रस्त्याच्या बाजूला सेवा मंडळाचे पुस्तक विक्री केंद्र सुरु आहे. तळ्याच्या बाजूला एका मोठ्या हॉलमध्ये अध्यात्मिक ग्रंथांचे ग्रंथालय इ.स. २००७ साली सुरु झाले. हे ग्रंथालय, सकाळी ९.३० ते ११.३० व दुपारी ४.०० ते ५.३० या वेळेत यात्रेकरुंसाठी खुले असते. ह्या वाचनालयात, जुन्या रामदासी मंडळींनी विशेषतः स. भ. अय्याबुवांनी काळजीपूर्वक सांभाळलेले दुर्मिळ ग्रंथ वाचकांकरीता उपलब्ध आहेत. ‘वेद’, ‘उपनिषदे’, ‘गीता’, ‘पुराणे’, ‘स्मृती’, ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘भागवत’, ‘कोष वाङ्मय’, ‘संत वाङ्मय’, ‘समर्थ वाङ्मय’, ‘इतिहास’, ‘चरित्र ग्रंथ’, ‘जुने साहित्य ग्रंथ’ अशा दुर्मिळ ग्रंथसंपदेबरोबरच, जुन्या पोथ्या मिळून जवळ जवळ आठ हजार पुस्तके अभ्यासकांसाठी उपलब्ध आहेत.
इ.स. १९६६ साली, सेवा मंडळाचा व्याप वाढत चालला. ‘सज्जनगड’ मासिकाच्या व मंडळाच्या अन्य कामासाठी श्री. बाबुराव वैद्य किंवा श्री. माधवराव हिरळीकर यांच्या घरी मुक्काम करावा लागे. त्यामुळे, साताऱ्यात सेवा मंडळाला एका हक्काच्या वास्तूची गरज भासू लागली. साताऱ्यातील श्री. ठकार यांनी घर विकण्याचे ठरविले. त्यात काही अडचणी आल्या, परंतु सेवा मंडळच हे घर खरेदी करणार असल्यामुळे ते तयार झाले. तेथील रहिवासी श्री. डांगे यांना घरासाठी पैसे दिल्यानंतर त्यांनी ते सेवा मंडळाकरीता सोडले. खरेदी करण्यासाठी, पैसे अपुरे असल्यामुळे समर्थ पादुकांचा दौरा मुंबई व गोवा येथे करुन त्याची पूर्तता केली. आवश्यक ती डागडुजी करुन समर्थांच्या मूर्तीची स्थापना तेथे केली. खऱ्या अर्थाने ते ‘समर्थ सदन’ झाले. मासिकाचे कार्यालय, प्रवचनादी विविध कार्यक्रम तेथे सुरु झाले, ‘दासनवमी उत्सव’ सुरु झाला. आज ते साताऱ्यातील महत्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे.
श्री समर्थ संत सेवा पुरस्कारचा प्रारंभ २००१ सालापासून करण्यात आला. 'श्री समर्थ संत सेवा पुरस्कार' सोहळ्यामध्ये अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत परम पूज्य समर्थ भक्तास दरवर्षी 'श्री समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड' यांच्यातर्फे पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
प्रदीर्घ प्रचाराशिवाय कोणतेही कार्य होत नाही; हे आधुनिक तंत्र त्यावेळी जाणून इ.स. १९५१ साली, समर्थ विचारांच्या प्रसारार्थ आणि ‘श्रीसमर्थ सेवा मंडळाच्या’ सर्व कार्यांची निवेदने, देणगीदारांची यादी, वार्षिक अहवाल लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘सज्जनगड’ हे मासिक सुरु केले. प्रथम हे पांच - सहा पानी पत्रिका स्वरुपात होते; नंतर मासिक स्वरुपांत सुरु झाले. हळूहळू त्याचे बाह्यांग व अंतरंग बदलून आज त्यातून भारतीय उच्च संस्कृतीची, संत वाङ्मयाची संपदा लोकांना सहज प्राप्त होत आहे. गेली ७० वर्षे, ह्या मासिकातून ज्ञानदानाचे पवित्र कार्य अविरतपणे सुरु आहे.
लोकांना समर्थांची आणि त्यांच्या तत्वज्ञानाची ओळख व्हावी, समर्थभक्तीने लोककल्याण व्हावे, सर्वत्र ‘जय जय रघुवीर समर्थ’ घोष गर्जावा अशा उद्देशाने, पहिला पादुका प्रचार दौरा आयोजित केला.
Time: 8:30am - 9:00am
Time: 8:30am - 9:00am
Time: 8:30am - 9:00am
Time: 8:30am - 9:00am