इ.स. १९६६ साली, सेवा मंडळाचा व्याप वाढत चालला. ‘सज्जनगड’ मासिकाच्या व मंडळाच्या अन्य कामासाठी श्री. बाबुराव वैद्य किंवा श्री. माधवराव हिरळीकर यांच्या घरी मुक्काम करावा लागे. त्यामुळे, साताऱ्यात सेवा मंडळाला एका हक्काच्या वास्तूची गरज भासू लागली. साताऱ्यातील श्री. ठकार यांनी घर विकण्याचे ठरविले. त्यात काही अडचणी आल्या, परंतु सेवा मंडळच हे घर खरेदी करणार असल्यामुळे ते तयार झाले.
तेथील रहिवासी श्री. डांगे यांना घरासाठी पैसे दिल्यानंतर त्यांनी ते सेवा मंडळाकरीता सोडले. खरेदी करण्यासाठी, पैसे अपुरे असल्यामुळे समर्थ पादुकांचा दौरा मुंबई व गोवा येथे करुन त्याची पूर्तता केली. आवश्यक ती डागडुजी करुन समर्थांच्या मूर्तीची स्थापना तेथे केली. खऱ्या अर्थाने ते ‘समर्थ सदन’ झाले. मासिकाचे कार्यालय, प्रवचनादी विविध कार्यक्रम तेथे सुरु झाले, ‘दासनवमी उत्सव’ सुरु झाला. आज ते साताऱ्यातील महत्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे.
इ.स. १९६७ साली कोयनेचा भूकंप झाला. त्यामुळे जीर्ण अवस्थेत असलेल्या चाफळ येथील श्रीराम मंदिर आणि मठाची अत्यंत दुरावस्था झाली. सेवा मंडळाने किरकोळ डागडुजी केली, कैच्या घातल्या. सज्जनगड मासिकातून लोकांची निवेदने येऊ लागली. रामाच्या पूजेसाठी मंदिरात जाणे कठीण झाले. ह्या सर्व जीर्णोद्धाराला भरपूर खर्च येणार होता. अण्णाबुवा, दिनकरबुवा यांनी अरविंदशेठ मफतलाल ह्यांची मुंबईत भेट घेतली. सर्व निश्चित केले. श्री. अरविंदशेठ मफतलाल यांनी नव्याने मंदिर बांधून देण्याचे कबूल केले. इ.स. १९६८ साली, त्याची पायाभरणी झाली. इ.स. १९७३ साली, सेवा मंडळाच्या सहकार्याने हे मंदिर बांधून पूर्ण झाले. त्यासाठी श्री. मफतलाल यांनी २२ लाख रुपये खर्च केला; आता तेथे स्वतंत्र ट्रस्ट काम करीत आहे.
खंडोबाच्या पालीजवळील कल्याणस्वामीचे बंधू दत्तात्रयस्वामींची समाधी असलेला ‘शिरगांव मठ’ दुर्लक्षित झाला होता. कारण तेथील वंशज ग्वाल्हेर नरेशांच्या बोलावण्यावरुन तेथे गेले व तेथेच स्थायिक झाले. सेवा मंडळातील जुने रामदासी अण्णाबुवा, दिनकरबुवा यांनी ग्वाल्हेर येथे जाऊन मठाचे वंशज बाबासाहेबांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी, सेवा मंडळानेच ह्यात लक्ष घालावे असे सांगितले तेथील जीर्णोद्धार करुन पूजा-अर्चा सेवा मंडळाने सुरु केली. त्याचप्रमाणे दहीफळ येथील समर्थांचे बंधू श्रेष्ठ गंगाधरस्वामी यांच्या समाधीचे संवर्धन करुन तेथे दैनंदिन पूजेची सोय केली.
इ.स. १९७६ साली, सेवा मंडळाचे विश्वस्त श्री. बन्याबापू गोडबोले यांनी सातारा कलेक्टरला भेटून रोजगार हमी योजनेखाली, प्रतापगडाप्रमाणे सज्जनगडावर रस्ता करण्याची शासनाची मंजुरी मिळवली. गजवडी मार्गे हा डांबरी रस्ता झाल्यावर एस. टी. आणि खाजगी वाहने गडावर येऊ लागली; मग तेथून (भातखळ्यावरील वाहनतळ) गडापर्यंत २५० पायऱ्या सेवा मंडळाने बांधल्या. त्यामुळे भक्तांची मोठीच सोय झाली. अशोक वनातील ७ ते१८ खोल्या बांधल्या.
लोकांना समर्थांची आणि त्यांच्या तत्वज्ञानाची ओळख व्हावी, समर्थभक्तीने लोककल्याण व्हावे, सर्वत्र ‘जय जय रघुवीर समर्थ’ घोष गर्जावा अशा उद्देशाने, पहिला पादुका प्रचार दौरा आयोजित केला.
Time: 8:30am - 9:00am
Time: 8:30am - 9:00am
Time: 8:30am - 9:00am
Time: 8:30am - 9:00am