दासबोध ग्रंथाचा पद्धतशीर अभ्यास व्हावा यासाठी महाडचे समर्थभक्त (कै.) आप्पा वैद्य यांनी शिवथरघळीत इ. स. १९६५ साली दासबोध वर्ग घेण्यास प्रारंभ केला. या वर्गामध्ये संपूर्ण ग्रंथाचे पारायण व प्रत्येक समासाचे थोडेफार विवरण केले जात असे. तिथे दररोज दासबोधाचे वाचन करण्याचा सल्ला दिला जाई; परंतु कोणीही त्याचा विशेष अभ्यास करताना दिसत नव्हते.
व्यक्ती आणि समाज यांची ऐहिक आणि पारलौकिक उन्नती साधणाऱ्या या दासबोध ग्रंथाचा सखोल अभ्यास व्हावा यासाठी काय उपाय करावेत, असा विचार समर्थभक्त द्वा. वा. केळकर यांच्या मनात आला. दासबोधाच्या नित्य वाचनातून मानवाला जीवनात यशप्राप्ती होते, सुखसमृद्धी व समाधान लाभते याची प्रचिती त्यांना स्वतःला आलेली होती. त्यामुळे पत्रद्वारा चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांच्या धर्तीवर अध्यात्माच्या क्षेत्रातही असा एक उपक्रम सुरू करून पहावा, असे त्यांना वाटले.
ते स्वतः महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे सदस्य होते. भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र यांचा नवा अभ्यासक्रम तयार करणे, पाठ्यपुस्तके लिहिणे व त्यावर प्रश्नपत्रिका काढणे या कामांचा त्यांना पाच वर्षांचा दांडगा अनुभव होता. नेमक्या याच पद्धतीचा वापर करून त्यांनी दासबोधावरील एक वर्षाचा पत्रद्वारा अभ्यासक्रम तयार केला.
१. समाजाला अध्यात्म साक्षर करणे.
२. ढासळणारी नीतिमूल्ये सावरून कुटुंबसंस्था सुरक्षित राखण्याचा
प्रयत्न करणे.
३. स्वकर्तृत्वाच्या बळावर आपण आपले भाग्य घडवू शकतो, ही जाणीव समाजात निर्माण
करणे.
४. व्यवहारी जगामध्ये कसे वागावे याचे नेटके शिक्षण देणे.
५. मानवी जीवनाचे अंतिम
सार्थक कशात आहे, हे दासबोधाच्या माध्यमातून समाजाला समजावणे.
१. 'विवेकाचे फळ ते सुख' - श्रीसमर्थांइतका विवेकाचा जळजळीत पुरस्कार भारतातीलच काय, पण भारताबाहेरीलही तत्त्वचिंतकांत क्वचितच दृष्टीस पडतो.
२. 'शरीराैसे यंत्र आणिक नाही' - शरीराचे अनन्यसाधारण महत्त्व ओळखून ते बलवान करावे. त्याला केवळ भोगी न बनवता परमार्थाचे साधन बनवावे आणि कीर्तीरूपाने उरवावे.
३. 'यत्न तो देव जाणावा' - उदंड कष्ट करूनच मनुष्य आपले भाग्य घडवतो. यत्नाची स्थापना थेट देवाच्या जागी करून, या 'यत्नदेवाची' आराधना करण्यास श्रीसमर्थ सांगतात.
४. 'कर्ममार्गी उपासना' - आपली विहित कर्तव्ये उत्तम प्रकारे पार पाडणे हीच ईश्वराची खरी पूजा होय. फलाशा न धरता कर्मे करत राहावीत.
५. 'प्रपंच करावा नेटका' - प्रपंच व परमार्थ यांचा सुमधुर समन्वय साधण्याची एक विशेष आणि व्यावहारिक शिकवण दासबोधात आहे.
६. 'प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाण' - प्रपंच यशस्वी करण्यासाठी जे अवगुण त्यागून सद्गुण जोपासावे लागतात, परमार्थप्राप्तीसाठीही त्यांचाच उपयोग होतो.
'सज्जनगड' मासिकाच्या नोव्हेंबर १९७८ च्या अंकामध्ये पत्रद्वारा दासबोध अभ्यास उपक्रमाचा पहिला लेख प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये एका समासावर ५ प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांच्या उत्तरांचा मासिकाच्या संपादकांकडे इतका प्रचंड ढीग साचला की, यासाठी एखादी स्वतंत्र आणि वेगळी योजना राबवणे गरजेचे आहे असे तत्कालीन संपादक स. भ. आण्णाबुवा कालगांवकर यांना प्रकर्षाने वाटले. याकरिता डिसेंबर १९७८ मध्ये सज्जनगडावर एक विशेष सभा घेण्यात आली आणि मासिकात एक वर्षापर्यंत हे लेख प्रसिद्ध करण्याचे निश्चित झाले. सुरुवातीला १७६ अभ्यासार्थींनी १२ स्वाध्याय पाठवून हा अभ्यासक्रम पूर्ण केला. या पहिलीच्या प्रशस्तिपत्रकांचे वितरण २६ डिसेंबर १९७९ रोजी सज्जनगडावर श्रीसमर्थ समाधीजवळ माननीय किसन महाराज साखरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मा. किसन महाराज साखरे म्हणाले, “आज या उपक्रमाची सांगता नव्हे, तर अनेक वर्षे जोमाने चालणाऱ्या एका मोठ्या उपक्रमाचा हा शुभारंभ आहे असे मी मानतो.”
अशा पद्धतीने श्रीसमर्थ सेवा मंडळाने या उपक्रमाचा अंगिकार केला. पुढे अभ्यासार्थींची संख्या अपेक्षेपेक्षा खूपच वाढल्यामुळे या अभ्यासक्रमात 'समीक्षक पद्धतीचा' उगम झाला. त्यानंतर इ. स. १९८० मध्ये ६५२ अभ्यासार्थींना प्रशस्तिपत्रके देण्याचा सोहळा सज्जनगडावर संपन्न झाला. याकरिता १८ समीक्षकांनी 'प्रवेश' या पहिल्या स्तरासाठी कार्य केले. यानंतर अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या स्तराचे नाव 'दासबोध परिचय' आणि तिसऱ्या स्तराला 'दासबोध प्रबोध' असे नाव दिले गेले. इ. स. १९८१ साली तब्बल एक हजार प्रशस्तिपत्रकांचे वाटप सज्जनगडावर झाले, यावरूनच या उपक्रमाच्या प्रगतीचा वेग लक्षात येतो.
या माध्यमातून दासबोधातील विवेक-वैराग्य, प्रयत्न-प्रचिती, लोकसंग्रह इत्यादी विषयांवरील प्रकल्पांची हस्तलिखिते तयार करण्यात येऊ लागली. गावोगावी दासबोध अभ्यास मंडळे चालवली जाऊ लागली. दरवर्षी डिसेंबर महिन्यात अभ्यासार्थींचा भव्य मेळावा व प्रशस्तिपत्र वितरणाचा कार्यक्रम सज्जनगडावर होऊ लागला. महाराष्ट्राप्रमाणेच आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गुजरात येथूनही अभ्यासार्थी या संमेलनासाठी गडावर येऊ लागले. तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी जे समास निवडण्यात आले होते, त्यासाठी 'प्रवेश', 'परिचय' आणि 'प्रबोध' या तीन वर्षांची स्वतंत्र पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली; ज्यासाठी अनेकांनी सढळ हस्ते अर्थसाहाय्य केले.
या उपक्रमाचा आलेख आजतागायत सातत्याने वाढतच गेला असून, आता हा अभ्यासक्रम गुजराती, कन्नड, हिंदी अशा अन्य भाषांमधूनही चालवला जात आहे. त्यासाठी निरनिराळ्या राज्यांत उपकेंद्रे स्थापन केली असून तेथील केंद्रसंचालक उत्तम कार्य करीत आहेत. इ. स. १९७८ पासून इ. स. २००८ पर्यंत स. भ. द्वा. वा. केळकर व त्यांच्या पत्नी सौ. गीताताई केळकर यांनी अपार कष्ट घेऊन हा उपक्रम नावारूपाला आणला. परंतु वयोमानानुसार त्यांना हे कार्य पुढे चालवणे कठीण झाल्यामुळे, हा उपक्रम इ. स. २००९ पासून 'ग्रंथराज दासबोध अध्ययन' या नावाने श्री. अशोक गानू यांच्या अध्यक्षतेखाली अविरत सुरू आहे. श्री. गानू यांच्यासह नऊ सदस्यांची 'ग्रंथराज दासबोध अध्ययन समिती' श्रीसमर्थ सेवा मंडळातर्फेच स्थापन करण्यात आली आहे. आतापर्यंत या उपक्रमाचा लाभ सुमारे १ लाखापेक्षा जास्त अभ्यासकांनी घेतला असून, त्यातूनच सुमारे ५,००० समीक्षक तयार झाले आहेत.
२१ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला या उपक्रमात प्रवेश दिला जातो. ही प्रवेश प्रक्रिया दरवर्षी १ जानेवारी ते १ मार्च या कालावधीत होते. हा अभ्यासक्रम पूर्ण तीन वर्षांचा असून त्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही (पूर्णपणे विनामूल्य). दर वर्षाच्या शेवटी अभ्यासकांना प्रशस्तिपत्रक दिले जाते.
प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती 'दासबोध प्रवेश' या पुस्तकात देण्यात आली आहे. पुस्तक मागवण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे:
अध्यक्ष - श्री ग्रंथराज दासबोध अध्ययन, श्री समर्थ सोसायटी, धन्वंतरी सभागृहामागे, पटवर्धन बाग, एरंडवणे, पुणे - ४११००४.
भ्रमणध्वनी - ९४२२३३४८८३
पुस्तकाचा खर्च: पुस्तक मागवण्यासाठी ८ रुपये पुस्तकाची किंमत व साधा पोस्टेज खर्च २ रुपये (रजिस्टर पोस्टेज खर्च २० रुपये) अशी एकूण १० रुपये किंवा २८ रुपयांची मनीऑर्डर करणे आवश्यक आहे. ही सर्व पुस्तके सज्जनगडावरही श्रीसमर्थ सेवा मंडळाच्या पुस्तक विक्री केंद्रावर उपलब्ध आहेत. (श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड - प्रकाशन विभाग या नावाने मनीऑर्डर केल्यास सज्जनगडावरून पुस्तके घरपोच पाठवण्यात येतील.)
संपर्क कार्यालय (सज्जनगड): श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड - ०२१६२ - २७८०१९
भ्रमणध्वनी : ९४०४६५३७४२
लोकांना समर्थांची आणि त्यांच्या तत्वज्ञानाची ओळख व्हावी, समर्थभक्तीने लोककल्याण व्हावे, सर्वत्र ‘जय जय रघुवीर समर्थ’ घोष गर्जावा अशा उद्देशाने, पहिला पादुका प्रचार दौरा आयोजित केला.
Time: 8:30am - 9:00am
Time: 8:30am - 9:00am
Time: 8:30am - 9:00am
Time: 8:30am - 9:00am