श्रीसमर्थ पादुका प्रचार दौरा महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही अनेकांस परिचित आहे. ह्या प्रचार दौ-याची उदात्त कल्पना इ. स. 1950 साली श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगड या संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष स. भ. बाबुराव वैद्य यांना सुचली. भाविकांना त्या काळात सज्जनगडावर येणे व वास्तव्य करणे कठीण होते. त्यामुळे आपणच भाविकांजवळ जाऊन त्यांना समर्थ पादुकांच्या दर्शनाचा लाभ घडवावा आणि कीर्तन, प्रवचन, भिक्षा फेरी इत्यादी माध्यमातून लोकांना समर्थांची व त्यांच्या तत्त्वज्ञानाची
ओळख व्हावी ह्या लोककल्याणकारी हेतूने पहिला श्रीसमर्थ पादुका प्रचार दौरा इ. स. 1950 साली बदरीनाथ येथे नेण्यात आला. वाटेत पुणे, मुंबई येथे झालेला समर्थ पादुकांचा सत्कार पाहून जनतेत समर्थांबद्दल असलेल्या श्रद्धेचा प्रत्यय आला. हा दौरा प्रचंड यशस्वी झाला. त्यावेळेपासून आजपर्यंत प्रतिवर्षी हा दौरा अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात येतो.
याप्रचार दौ-यात मिळणा-या धान्याच्या भिक्षेमुळे सज्जनगडावरील मुक्तद्वार अन्नसत्राची सोय झाली व धनामुळे जीर्णोद्धार व विकासकार्याला गती मिळाली. या दौ-यांमुळे समर्थ वाङ्मयाचा आणि समर्थभक्तीचा प्रसार व प्रचार होऊन सज्जनगडावर भाविकांची गर्दी वाढू लागली. याकरीता समर्थ सेवा मंडळाने भाविकांसाठी सज्जनगडावर येण्याचा रस्ता, एस. टी. ची सोय, नि:शुल्क निवास व्यवस्था आणि भोजन प्रसादाची सोय केली. ह्या प्रचार दौ-यांमुळे समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर व विद्वान मंडळी संस्थेशी कायम स्वरुपाने जोडली गेली.
इ. स. 1950 ते 1978 पर्यंत श्रीसमर्थ सेवा मंडळाचे तत्कालीन कार्यवाह स. भ. दिनकरबुवा रामदासी यांनी इतर अनेक रामदासी सहका-यांसह पादुका प्रचार दौ-याची धुरा सांभाळली. त्यानंतर इ. स. 1979 पासून विद्यमान कार्यवाह स. भ. मारुतीबुवा रामदासी यांनी ही परंपरा इ. स. 2010 पर्यंत ही परंपरा यशस्वीपणे चालवली. इ. स. 2000 पासून प्रतिवर्षी श्रीसमर्थ पादुका सिंगापूर - मलेशिया यांसारख्या परदेशांत नेण्याची मुहूर्तमेढ रोवण्याचे श्रेय स. भ. मारुतीबुवा रामदासी यांनाच आहे. संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, गोवा यासारख्या अनेक राज्यांत पादुकांचा यशस्वीपणे दौरा आयोजित करण्याचे कार्य स. भ. मारुतीबुवा रामदासी यांनी उत्सफूर्तपणे केले. इ. स. 2011 पासून हीच परंपरा स. भ. योगेशबुवा रामदासी त्याच धडाडीने सांभाळीत आहेत.
श्रीसमर्थ पादुका प्रचार दौ-यात सज्जनगडावरील दैनंदिन कार्यक्रमांप्रमाणेच सकाळच्या काकआरतीपासून ते रात्रीच्या शेजारतीपर्यंत कार्यक्रम असतात. सकाळी 6 वाजता समर्थ पादुकांची काकडआरती, त्यानंतर षोडशोपचार पूजा, नंतर 8 ते 12 या वेळांत शहराच्या विविध भागातून भिक्षा फेरी, सायंकाळी 5 वाजता सांप्रदायिक उपासना व पंचोपचार पूजा व आरती, सायंकाळी 6 ते 9 पर्यंत कीर्तन, त्यानंतर शेजारती असा दैनंदिन कार्यक्रम असतो. मुक्कामाच्या ठिकाणी श्री समर्थ पादुका दर्शनासाठी असतात. तसेच पुस्तक विक्री केंद्र व दौ-याचे कार्यालय असते. भाविकांना श्रीसमर्थ पादुका आपल्या घरी नेऊन त्यांचे स्वहस्ते पूजन करता येते. त्याकरीता दौ-याच्या कार्यालयात नोंद करावी लागते.
भिक्षा फेरीची सर्व माहिती आदल्या दिवशी ध्वनीक्षेपकाद्वारे सायंकाळी 6 ते 8 या वेळात शहराच्या संबंधित विभागात दिली जाते. त्याचबरोबर पादुकांच्या मुक्कामाचे ठिकाण व दैनंदिन कार्यक्रम यांचीही माहिती दिली जाते. भिक्षा फेरीत सज्जनगडावरील रामदासी मंडळी श्रीसमर्थांच्या मनाच्या श्लोकांची गर्जना करतात व रघुपती राघव राजाराम हे भजन म्हणतात, त्यावेळी भाविक त्यांच्या झोळीत गहू, तांदूळ, डाळ, साखर, गूळ व पैसे आपापल्या शक्तीनुसार श्रद्धेने अर्पण करतात. सांप्रदायिक नियमानुसार भिक्षा फेरीतील कोणताही रामदासी झोळी घेऊन कोणाच्याही घरात जात नाही. भाविकांना आपापली भिक्षा बाहेर आणून रामदासी मंडळींच्या झोळीत अर्पण करावी लागते.
ह्या संपूर्ण दौ-याचे श्रेय निस्पृहपणे कार्य करणारे गडावरील रामदासी, कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करणारे सध्याचे कीर्तनकार स. भ. मकरंदबुवा रामदासी, दौ-यात उत्स्फूर्तपणे सेवाकार्य करणारे स्थानिक समर्थभक्त आणि सर्व भाविकांना आहे.
लोकांना समर्थांची आणि त्यांच्या तत्वज्ञानाची ओळख व्हावी, समर्थभक्तीने लोककल्याण व्हावे, सर्वत्र ‘जय जय रघुवीर समर्थ’ घोष गर्जावा अशा उद्देशाने, पहिला पादुका प्रचार दौरा आयोजित केला.
Time: 8:30am - 9:00am
Time: 8:30am - 9:00am
Time: 8:30am - 9:00am
Time: 8:30am - 9:00am